मुंबईकर कधी नव्हे इतका थंडीचा आनंद घेत असताना मुंबईतली थंडी अचानक गायब झाली आहे. महाराष्ट्र गारठलेला असताना किनारपट्टीसह मुंबई मात्र उकाडय़ाने हैराण झाली आहे. मुंबईतली थंडी अशी का? काय आहेत त्यामागची पर्यावरणीय कारणं?

भारतीय हवामान विभागाने सर्वसाधारणत: चार ऋतूंची व्याख्या केलेली आहे. जून ते सप्टेंबर हा मान्सून ऋतू, ऑक्टोबर ते डिसेंबर पोस्ट मान्सून ऋतू, मार्च ते मे प्री मान्सून ऋतू; ज्याला आपण उन्हाळा म्हणतो आणि जानेवारी-फेब्रुवारी हिवाळा. मान्सूनच्या आधीचे आणि नंतरचे तीन महिने या कालावधीला हवामान विभाग सायक्लॉन सीझन असंही म्हणतो. चक्रीवादळ येण्याची संभावना या दोन कालावधीत सर्वाधिक असते. हे दोन्ही ऋतू सुरू होण्यापूर्वी तत्संबंधीची पूर्वतयारी केली जाते.  समुद्रकिनाऱ्यालगतची निरीक्षण केंद्र, रडार्स, यंत्रणा, डेटाबेस, संवाद साधण्याची यंत्रणा हे सगळं व्यवस्थित आहे की नाही हे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर (प्री आणि पोस्ट मान्सून सीझन) तपासलं जातं. त्याचा एक अहवाल तयार करून तो दिल्लीला पाठवला जातो. या चार ऋतूंपैकी राहिले दोन महिने; जानेवारी आणि फेब्रुवारी. हे दोन्ही महिने संपूर्ण देशासाठी हिवाळ्याचे असतात. पण त्याची सुरुवात उत्तर भारतात नोव्हेंबरपासूनच होते. तर काही भागांत डिसेंबर महिन्यातही होते. हिवाळा हा ऋतू देशभर प्रामुख्याने जानेवारी आणि फेब्रुवारीत दिसून येतो. ईशान्येकडील प्रदेशांमध्ये डिसेंबरमध्ये कडक हिवाळा असतो. तर जम्मू-काश्मीरमध्येही तशीच परिस्थिती असते.

Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
Petrol Diesel Price Today 15 April 2024
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात बदलले इंधनाचे दर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये
All the four Municipal Corporations like Mumbai Thane Pune Nagpur have emphasized on public awareness to increase the voter turnout in metropolitan cities
मतटक्का वाढवण्याचे लक्ष्य; आयोगाला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत चिंता; जनजागृतीवर भर
Petrol Diesel Price Today 29 March 2024
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त? मुंबई-पुण्यात किती पैसे मोजावे लागणार?

यंदाच्या हिवाळ्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. याचं विशेष कारण म्हणजे मुंबईमधील थंडी. मुंबईतील थंडीने यावेळी बराच काळ मुक्काम ठोकला आहे. यंदा हिवाळ्याची तीव्रता डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून जाणवू लागली. ढोबळमानाने हिवाळा नोव्हेंबरपासून सुरू होतो, असं म्हटलं जातं. पण पावसासारखी हिवाळ्याची महाराष्ट्रात दाखल होण्याची विशिष्ट अशी तारीख नाही. पावसाळा सुरू होण्याआधी त्यासंबंधीच्या बातम्या पसरतात. पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची अंदाजे तारीख त्यामध्ये नमूद केलेली असते. केरळमध्ये पाऊस आला की त्यानंतर काही दिवसांतच तो मुंबईतही दाखल होतो. एकदा मुंबईत पाऊस सुरू झाला की तो तिथे स्थिरावतो. पण हिवाळ्याचं तसं काहीच सांगता येत नाही. मुंबई हे समुद्रकिनारपट्टीजवळ वसलेलं शहर आहे. समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागातील शहरांमध्ये हिवाळा कधी सुरू होईल, हे नेमकं सांगता येत नाही. तिथे दोन प्रकारचे वारे वाहतात. खारे वारे आणि मतलई वारे. खारे वारे दिवसा तर मतलई वारे रात्री वाहतात. खारे वारे दिवसा वाहत असल्यामुळे समुद्रातून मिळणाऱ्या बाष्पाचा जमिनीवर सतत पुरवठा होत असतो. संपूर्ण देशात सर्वसाधारणपणे हवेमधील आद्र्रता सरासरी ७० ते ८० टक्के इतकी असते. पण ती नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थोडय़ा कालावधीसाठी ४० ते ६० टक्के इतकी होते. उत्तर भारतात कडक हिवाळा सुरू असेल आणि उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता अधिक असेल तर त्यावेळी मुंबई गारठण्याची शक्यता असते. बस, ट्रेनच्या खिडक्या बंद होणं, सीएसएमटी, चर्चगेट स्टेशनवर स्वेटर विकायला सुरुवात होणं, फ्लेमिंगो पक्ष्यांचं मुंबईत येणं; या मुंबईत हिवाळा सुरू झाल्याच्या काही खुणा आहेत.

मुंबई वगळता महाराष्ट्रात इतर ठिकाणी हिवाळा सुरू झाला की तिथेच स्थिरावतो. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी एकदा तापमानात घसरण सुरू झाली की पुन्हा संपूर्ण हिवाळ्यामध्ये ते तापमान वाढण्याची शक्यता फारच कमी असते. तिथलं सरासरी तापमान पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालं की तिथे शीत लहरींचा प्रभाव आहे, असं म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या आतल्या भागात एकदा थंडी सुरू झाली की ती बराच काळ तशीच राहते. मुंबईत मात्र तसं होत नाही. मुंबईत थंडी येऊन-जाऊन असते. मुंबईतल्या हिवाळ्यामध्ये सातत्य नसल्यामुळे आपण त्याला ‘मुंबईचा जावई’ म्हणू शकतो; जो अधूनमधून येत असतो.

नाशिक, बीड, जालना, परभणी, गोंदिया ही ठिकाणं हिवाळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा काही ठिकाणी तापमानात खूप घसरण होत असते. अशा ठिकाणी एक आकडी म्हणजे एक ते नऊ अशा एक आकडी अंश सेल्सिअस इतकं तापमान होण्याचीही शक्यता असते. भारतीय हवामान विभागाच्या वेबसाइटवर वेगवेगळ्या शहरांचं त्या त्या दिवसाचं तापमान आणि त्यापुढील पाच दिवसांच्या तापमानाचं पूर्वानुमान नोंदवलेलं असतं. आपण विषुववृत्तीय प्रदेशात असल्यामुळे तापमानाचे असे चढ-उतार होतच असतात. महाराष्ट्राच्या आतल्या भागात शीतलहरी येतात. शीतलहरींचा जनसामान्यांवर आणि पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धुकं दिसतं; तर मुंबईमध्ये धुरकं दिसतात. याबाबतचं पूर्वानुमानही हवामान विभाग देतं. डेन्स फॉग म्हणजे दाट धुकं आणि श्ॉलो फॉग म्हणजे हलकं धुकं अशा दोन प्रकारांमध्ये धुकं दिसतं.

पश्चिम महाराष्ट्राला अरबी समुद्राची किनारपट्टी लाभल्यामुळे आणि उत्तर-दक्षिण असलेल्या सह्य़ाद्रीच्या रांगांमुळे राज्याच्या सर्वसाधारणत: पूर्व आणि पश्चिम हवामानामध्ये खूप अंतर आहे. कोकण किनारपट्टी, महाराष्ट्राचा आतला भाग आणि पश्चिमेला अरबी समुद्र असल्यामुळे कोकणात वर्षभर हवामान साधारणत: दमट आणि उष्ण राहतं. मान्सूनमध्ये मुसळधार पाऊस असतो. हिवाळ्यात तापमान जास्त खाली घसरत नाही. पण त्याच्याविरुद्ध सह्य़ाद्रीच्या पलीकडचा भाग ज्याला महाराष्ट्राचा आतला भाग म्हणू शकतो तिथे बहुतांश वातावरण कोरडे असते. उन्हाळ्यात अतिशय उष्ण तर हिवाळ्यात अत्यंत थंड राहते. मान्सूनच्या बाबतीत ही भिन्नता दोन्ही भागांमध्ये आढळून येते. एकंदर महाराष्ट्राच्या आतल्या भागात हिवाळ्यामध्ये आपल्याला जे हवामान दिसते त्यात प्रामुख्याने शीतलहरींचा प्रभाव जास्त दिसतो. तर काही वेळा गारा पडण्याचीही शक्यता असते. गारा पडल्यामुळे पिकांची नासाडी होणे, नुकसान होणे अशा प्रकारचे परिणाम हिवाळ्यात दिसून येतात. हवामान विभागातर्फे शीतलहरी किंवा गारा पडण्याची शक्यता असते त्याचे पूर्वानुमान अगोदर दिले जाते. खासकरून डॉप्लर रडारच्या माध्यमातून गारा पडण्याची शक्यता वर्तविता येते. तीन- चार तास अगोदर त्याचा इशाराही देता येऊ शकतो.

मुंबई उत्तर कोकणात मोडणारं शहर आहे. बऱ्याचदा उत्तर भारतातील थंडी आणि गुजरातमधल्या सरासरीपेक्षा कमी झालेल्या तापमानाचा परिणाम मुंबई, डहाणू आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसण्याची शक्यता असते. पण महाराष्ट्राच्या आतल्या भागाच्या तापमानाचा मुंबईवर काही परिणाम होत नाही. याला कारण सह्य़ाद्रीच्या रांगा. या रांगा एखाद्या भिंतीसारख्या आहेत. त्यामुळे या तापमानाचा मुंबईवर आणि मुंबईचा त्या भागावर तसा परिणाम होत नाही. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कधी कधी रेंगाळतो. त्याचा चांगला परिणाम हिवाळ्यातील रब्बी पिकांवर होतो. कारण रब्बी पिकांसाठी जमिनीत ओल आवश्यक असते आणि ती रेंगाळलेल्या पावसामुळे मिळते.

२०१६ आणि २०१७ या दोन्ही वर्षी जानेवारी महिन्यात मुंबईच्या किमान तापमानातील सर्वोच्च तापमान १९ अंश सेल्सिअस इतकं होतं. म्हणजेच या दोन्ही वर्षांमध्ये जानेवारी महिन्यात किमान तापमान हे नेहमी १९ अंश सेल्सिअसपेक्षा कमीच होतं. सर्वाधिक कमी तापमानाचा विक्रम १९६२ साली झाला होता. जानेवारी १९६२ मध्ये मुंबईचं तापमान ७.४ अंश सेल्सिअस इतकं होतं. हे आजवरचं सर्वाधिक कमी तापमान आहे. मुंबईचं किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस इतकं असतं; तेव्हा मुंबईकरांना गारठा जाणवायला लागतो. उत्तर भारतात थंडीची लाट आहे. तिथून मुंबईकडे येणारे वारे शुष्क असतात. त्यावेळी हवेची आद्र्रता कधी कधी ४० ते ५० टक्क्य़ांपर्यंत असते. वास्तविक मुंबईत आद्र्रता ७०-८० टक्क्य़ांच्या आसपास असते. पण हा आद्र्रता कमी होण्याचा प्रभाव काही कालावधीसाठीच असतो. मुंबईत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी व्हायला लागलं की बोचरे वारे वाहू लागतात. अशा वेळी मुंबईकरांसाठी तो ‘प्लेझंट विंटर’ सुरू झाला असं म्हणता येतं.

तापमानातील चढ-उतारांमध्ये खारे वारे आणि मतलई वारे हे दोन्ही प्रमुख भूमिका बजावतात. समुद्रातून शहराकडे जेवढा जास्त दमटपणा येतो; तितकी तापमानातील घट कमी असण्याची शक्यता असते. ईशान्य किंवा नैर्ऋत्य दिशेने समुद्रातून येणाऱ्या शुष्क गार वाऱ्यामध्ये बाष्प असतं. खारे वारे आणि मतलई वारे या दोन प्रकारच्या वाऱ्यांच्या तीव्रतेमध्ये किंवा त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेमध्ये फरक पडला तर मुंबईचं तापमान कमी-जास्त होऊ शकतं. मुंबईमध्ये खारे वारे सरासरी साडेबाराच्या सुमारास वाहू लागतात. ही त्यांची सरासरी वेळ आहे. पण काही कारणास्तव हेच वारे दोन किंवा अडीच वाजता वाहू लागले तर तापमान कमाल ३७-३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं दिसेल. म्हणजेच मुंबई शहराच्या तापमानावर खाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतो. हे खारे वारे नागपूर, वर्धा किंवा मराठवाडय़ामध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे तिथे तापमान सतत वाढत राहतं. मुंबईचं तापमान क्वचित ४० अंश सेल्सिअसपेक्षा वर गेलं आहे. ते न जाण्याचं कारण म्हणजे दुपारी सुरू होणारे खारे वारे. ते काही कारणास्तव उशिरा किंवा लवकर आले तर तापमानात चढ-उतार दिसू शकतो.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ओखी वादळ आलं आणि त्यानंतर एक दिवस प्रचंड पाऊस पडला. या एका दिवसाच्या पावसानंतर हवेत गारवा आला. थंडी वाढली. या पावसामुळे थंडी वाढली असा एक समज सगळीकडे पसरला. पण प्रत्यक्षात असं नसून त्यामागचं विज्ञान काहीसं वेगळं आहे. ओखी वादळ अरबी समुद्रात फार दूर असतानाच त्याचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं. सर्वसाधारणपणे चक्रीवादळामुळे पाऊस कमी पडतो. पण त्याच्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. त्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. ओखी वादळाच्या वेळी नेमकं हेच झालं. त्यावेळी मुंबईत पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली. डिसेंबर महिना लक्षात घेता हवेतील आद्र्रता कमी असायला हवी होती. पण ती त्या दिवसांमध्ये ९०-९५ टक्के इतकी झाली. त्यामुळेच मुंबईत त्यापुढचे तीनचार दिवस धुरक्याचा प्रभाव बघायला मिळाला. त्या दिवसांमध्ये मुंबईचं तापमान सरासरीपेक्षा आठ ते नऊ अंश सेल्सिअस इतकं कमी झालं होतं. पण हा हिवाळ्याचा प्रभाव नसून चक्रीवादळाचा प्रभाव होता. दिवसभर पडलेल्या पावसामुळे गारठा निर्माण झाला होता. गेल्या आठवडय़ापासून तापमानात घट झाली. तो मात्र  हिवाळ्याचा परिणाम होता. पण डिसेंबरमध्ये तापमानात झालेली घट चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसामुळे होती. पावसामुळे झालेल्या तापमान बदलामुळे हवेत दमटपणा आला होता. त्यामुळे पुढचे काही दिवस धुकं आणि धुरकं असे दोन्ही परिणाम दिसत होते. हिवाळ्यात डिसेंबरमध्ये पडलेला ३२ मिमी इतका पाऊस आजवर सर्वाधिक पाऊस होता. पण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ओखी वादळामुळे झालेला पाऊस विक्रमी (ऑल टाइम रेकॉर्ड) झाला आहे. कारण याआधी डिसेंबर महिन्यात आलेले चक्रीवादळ अरबी समुद्रात इतक्या जवळ कधीच आलं नव्हतं. वाऱ्याची दिशा बदलली की तापमानात बदल होतो. उत्तरेकडच्या वाऱ्यांऐवजी पूर्वेकडून वारे वाहू लागले की मुंबईचं तापमान वाढतं. गेल्या आठवडय़ात काही दिवसांचं तापमान हळूहळू वाढत होतं. त्यामुळे तापमानात होणारी घट किंवा वाढ हे तिथल्या वाऱ्याच्या दिशेवर आणि तीव्रतेवर अवलंबून असते.

लानिना आणि अलनिनो यांचा पावसाशी संबंध येतो. पण त्याचा हिवाळ्याशी संबंध येतो का, हेदेखील विचारात घ्यावे लागेल. अलनिनो म्हणजे विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान त्याच्या सरासरीपेक्षा वाढतं. सर्वसाधारणत: ही घडामोड दक्षिण अमेरिकेच्या पेरू या देशाच्या किनारपट्टीवर होते. याचा परिणाम भारतातल्या मान्सूनवर होऊन इथे पाऊस कमी पडतो. पण अशी अनेक वर्षे आहेत ज्या वेळी अलनिनो उद्भवला; पण भारतातला पाऊस हा सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्तही होता. त्यामुळे अलनिनोचा परिणाम भारतातल्या पावसावर नेहमीच होईल हे म्हणणे चुकीचे ठरू शकेल. लानिना हा प्रकार अलनिनोच्या एकदम विरुद्ध असतो.  लानिनामध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी होते. याचा बऱ्याचदा भारतीय पावसाळ्यावर सकारात्मक परिणाम दिसतो. लानिना आणि अलनिनो हे वैश्विक घटक आहेत. वैश्विक घटकांचा प्रभाव प्रादेशिक पातळीवर होत असला तरी प्रादेशिक घटकांवर झालेल्या प्रभावाचा संबंध वैश्विक घटकांशी जोडणं खूप धाडसाचं ठरेल.

वेस्टर्न डिस्टर्बन्स ही आणखी एक संकल्पना इथे समजून घ्यावी लागेल. वेस्टर्न डिस्टर्बन्सला हवामान विभागात एक्स्ट्रा ट्रॉपिकल सिस्टीम म्हणतात. म्हणजे उष्ण कटीबंधाच्या वरील भागातील हवामानाची प्रणाली. सर्वसाधारणत: अशा प्रकारच्या प्रणाली भूमध्य समुद्रात निर्माण होतात. त्यामुळे खास करून उत्तर भारत आणि उत्तर पश्चिम भारतामध्ये पाऊस किंवा बर्फवृष्टीसारखे हवामान आपल्याला दिसते. उत्तर भारतात सखल भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असते. वेस्टर्न डिस्टर्बन्स या प्रणालीमुळे हिमालयाच्या डोंगराळ भागात जोरदार किंवा मुसळधार किंवा बर्फवृष्टीची शक्यता असते. याचा मुख्य फायदा रब्बी पिकांसाठी होतो. उत्तर भारतातील गहू हे  महत्त्वाचं पीक भारताच्या अन्नसुरक्षेसंदर्भातलं एक महत्त्वाचं पीक आहे. ते पावसावर अवलंबून असतं. त्यामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्स प्रणालीचा शेतीला उपयोग होतो.

या सगळ्यामुळे सर्वसाधारणपणे उत्तर भारतात ढगाळ वातावरण राहतं. रात्रीच्या तापमानात वाढ दिसते. त्यामुळे पाऊस किंवा काही ठिकाणी बर्फवृष्टीसुद्धा दिसते. कधीकधी याची तीव्रता वाढली की भूस्खलन (लँडस्लाइड), पूर, तीव्र शीतलहरी, पिकाचं नुकसान, दाट धुके हा परिणाम उत्तर भारतात दिसतो. अशा प्रकारे ज्यावेळी या एक्स्ट्रा ट्रॉपिकलसिस्टीम अ‍ॅक्टिव्ह असतात. आणि वाऱ्याची दिशा महाराष्ट्रात मुंबईकडे आणि उत्तरेची असेल तर मग त्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रातही दिसू शकतो.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात हिवाळ्यात पाऊस पडतो. या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वारे अफगाणिस्तानातून उत्तर भारतात जम्मू काश्मिरमधून पुढे सरकतात. त्याचा प्रभाव संपूर्ण देशाच्या हवामानावर होऊन सगळा देशच गारठतो. हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस हे उत्तर भारतीयांसाठी वरदान असतं. त्यांच्याकडच्या बहुतांश शेतीला ते पोषक आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पडणाऱ्या पावसाचा उत्तर भारतातील काही राज्यांना फायदा होतो. या सगळ्याचा प्रभाव आपल्याकडे दिसतो.

१८७५ साली भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली. या १५ जानेवारीला भारतीय हवामान विभागाचा १४३ वा वर्धापन दिन होता. या विभागाने आजवर वेगवेगळे प्रयोग करत हवामानाचा पूर्वानुमान दिला आहे. यावेळीही पूर्वानुमानाचा योग्य तो तपशील विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जातोय. याचा सर्वाधिक फायदा कृषी विभागाला होत आहे. भारतीय हवामान विभाग संपूर्ण महाराष्ट्रासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार त्यापुढच्या पाच दिवसांचं जिल्ह्य़ांनुसार तापमानाचं पूर्वानुमान देतं. तापमान, आद्र्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, आकाशातील ढगांचं प्रमाण या कृषीसंबंधी बाबींची माहिती भारतीय हवामान विभागाच्या  वेबसाइटवर दिली जाते. ही सगळी माहिती कृषिविद्यापीठाकडेही जाते. त्याच्यातून शेतीविषयक मार्गदर्शन मिळतं. उदा: नाशिकमध्ये येत्या दोन दिवसांत किमान तापमान चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिल्यावर तेथील शेतकरी त्यादृष्टीने द्राक्षांची काळजी घेतात. प्रत्येक फळाची किमान तापमान सहन करण्याची क्षमता असते. द्राक्षांची ही क्षमता साडेचार अंश सेल्सिअस इतकी आहे. त्यापेक्षा कमी तापमानात द्राक्षांचं नुकसान होतं. पण तिथल्या शेतकऱ्यांना पुढच्या तापमानाची माहिती आधीच मिळाली तर ते त्यानुसार त्याची काळजी घेतात. अशा प्रकारे हवामान विभागाने दिलेली माहिती लक्षात घेऊन शेतकरी त्यांच्या पिकांची काळजी घेतात. उन्हाळा आणि पावसाळा अशा दोन्ही ऋतूंमध्ये त्यांना योग्य ती माहिती आणि सल्ले दिले जातात. तसंच शेतकऱ्यांशी हवामान विभागाचा थेट संपर्क असतो. काही शेतकरी कृषिविद्यापीठांच्या संपर्कात असतात. रेडिओ, एसएमएस, आणि इमेलद्वारेसुद्धा ही माहिती पुरवली जाते.

सध्या भारतीय हवामान विभाग जिल्ह्य़ाच्या पातळीवर कृषीविषयक पूर्वानुमान देतोय. पण येत्या दोन वर्षांत तालुका पातळीवर पूर्वानुमान दिलं जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले संगणकीकरण, यंत्रणा, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ या सगळ्याचा पाठपुरावा सुरू आहे.
(लेखक हे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रात उपमहासंचालक म्हणून कार्यरत आहेत.)
कृष्णानंद होसाळीकर – response.lokprabha@expressindia.com
शब्दांकन : चैताली जोशी