एका महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना तिच्या पोटात साखळ्या, हेअर पिन, यू पिन, ब्रेसलेट्स असं सगळं आढळून आलं. या सगळ्याचं वजन दीड किलो असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. या बाईच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अहमदाबादमध्ये तिला दाखल करण्यात आलं. एवढंच नाही तर तिच्या पोटात एक दोरीही आढळली. ही महिला मनोरूग्ण आहे. तिने वेडाच्या भरात हे सगळं गिळलं असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

संगिता असं या महिला रूग्णाचं नाव आहे. तिला अहमादाबादच्या मनोरूग्णालयातून सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला पोटदुखीचा सातत्याने त्रास होत होता म्हणून तिला सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे तिच्यावर जेव्हा शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा डॉक्टरांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. या आजारामध्ये मनोरूग्ण लोखंड किंवा तत्सम धातूच्या काही गोष्टी गिळतो त्याच्याही नकळत तो ही कृती करत असतो असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

आम्ही जेव्हा महिलेला तपासले तेव्हा आमच्या लक्षात आले की या महिलेचे पोट एखाद्या खडकासारखे कठोर झाले आहे. तिच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला तेव्हा तिच्या पोटात अनेक सेफ्टी पिना, यू पिन्स, साखळ्या असल्याचे आढळले. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही तातडीने घेतला. आता तिच्या पोटातून ज्या पिना, साखळ्या आणि इतर साहित्य बाहेर काढण्यात आले त्याचे वजन दीड किलो इतके प्रचंड आहे. तिच्यावर उपचार करून आम्ही तिला पुन्हा मनोरूग्णालयाच्या ताब्यात देणार आहोत असेही सरकारी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.