जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. सर्व सामान्य जनतेबरोबरच प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, परिचारीकांसह सीमेवर लढणारे जवान देखील करोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे.   मागील 24 तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (बीएसएफ) दहा जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोवीड स्पेशल हॉस्पिटलमध्ये या सर्व जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, कालपासून या अगोदर करोना पॉझिटिव्ह आढलेल्या 13 जवानांना  डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. हे सर्व जवान दिल्लीचे असल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आलेली आहे.

देशात करोनाबाधितांची संख्या आता 90 हजार 927 पर्यंत पोहचली आहे. तर मागील चोवीस तासांत देशभरात 4 हजार 987 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या  53 हजार 946 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 34 हजार 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. करोनामुळे देशात आतापर्यंत 2 हजार 872 जणांचा बळी गेलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.