एका अस्वलाला मारण्यासाठी बंदुकीतून १०० गोळ्या झाडल्याची घटना छत्तीसगढमधील महासमुंद जिल्ह्यात घडली. शनिवारी घडलेल्या घटनेत दोन गावकऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या या मादी अस्वलासाठी पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली होती. तत्पूर्वी वन अधिकाऱ्यांनी हिंसक अस्वलाला बेशुद्ध करण्याचा असफल प्रयत्न केला. नंतर पोलिसांची मदत घेण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०० पैकी १६ गोळ्या तिला लागल्या.
अस्वल फार आक्रमक झाले होते. कारवाईदरम्यान तिने एका अधिकाऱ्यावरदेखील हल्ला केल्याने तिला मारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, अशी माहिती महासमुंदचे पोलीस उपायुक्त राजेश कुकरेजा यांनी दिली. छत्तीसगढमध्ये मोठ्याप्रमाणावर अस्वल आढळून येतात.