दळणवळणाच्या अपुऱ्या साधनांमुळे म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदत पोहचविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य म्यानमारमधील अनेक भागात रविवारी ६.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये किमान १३ जण मृत्युमुखी पडले असून १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे म्यानमारमधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मंडालेमधील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.
या भूकंपामध्ये बेघर झालेल्या नागरिकांच्या निवासाची सोय करून देण्याचे काम सरकारी यंत्रनेने सुरू केले आहे. मात्र दळणवळणाच्या अपुऱ्या साधनांमुळे दुर्गम भागात मदतकार्य पोहचविण्यात अनेक अडथळे येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
आपल्या गावात आतापर्यंत कोणतीही मदत पोहचली नसल्याची माहिती मंडालेच्या उत्तरेस असलेल्या गावातील नागरिकांनी दिली आहे. या गावातील १२ जण या भूकंपात जखमी झाले असून अनेक इमारतींचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
या भूकंपाचे धक्के शेजारील थायलंडमध्येही जाणवले. बॅँकॉकमधील अमेरिकी भूगर्भशास्त्र विभागाच्या कार्यालयात मुख्य धक्क्यानंतर बसलेल्या प्रमुख उपधक्क्यांची तीव्रता ५.८ व ५.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली.