ईलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनमधील (ईव्हीएम) बिघाड आणि छेडछाडीच्या अनेक घटना गेल्या काही निवडणुकांदरम्यान समोर आल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षी होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे घेण्यात यावी, अशी मागणी देशातील १२ राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


विशेष म्हणजे जर ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही या पक्षांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. मतपत्रिकेच्या वापराची मागणी करणाऱ्या पक्षांमध्ये तृणमुल काँग्रेस आणि समाजवादी पक्षांचाही समावेश आहे. समाजवादी पक्षाने यापूर्वी अनेकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते रामगोपाल यादव म्हणाले होते की, आगामी लोकसभा निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे घेतली जावी. जर असे झाले नाही तर पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल. त्याचबरोबर या मागणीसह अन्य पक्षांशी चर्चा करुन निवडणूक आयोगावर दबाव टाकला जाईल.

दरम्यान, देशात गेल्या काही काळात झालेल्या निवडणुकांदरम्यान विरोधीपक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछेड केल्याचे आरोप केले आहेत. २०१४ नंतरच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमलाच पक्षांच्या पराभवाला जबाबदार धरण्यात आले होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर बसपा आणि सपा या पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला होता. तर पंजाबमधील निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ईव्हीएममधील फेरफेराचा मुद्दा उपस्थित केला होता.