पश्चिम घाटसंदर्भातील माधव गाडगीळ समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीला केरळ राज्यात मोठय़ा प्रमाणावर विरोध होत असतानाच केरळमध्ये जवळपास १७०० ठिकाणी पर्वतराजींमध्ये बेकायदेशीर दगडखाणींचे काम सुरू असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी केला आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री जयराम रमेश उपस्थित असलेल्या जाहीर कार्यक्रमात गाडगीळ यांनी हा आरोप केला आहे. ओरिसामधील कोरापूट येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओरिसातर्फे माधव गाडगीळ यांना डीग्री ऑफ डॉक्टर ऑफ सायन्स हा किताब प्रदान करण्यात आला.  केरळमधील दगडखाणींच्या कामाबाबत लोक नाराज आहेत. पश्चिम घाटाच्या परिघातच हे खोदकाम सुरू आहे. दगडखाणी आणि दगड फोडून त्याची वाळू बनविणारी यंत्रे या परिसरात मोठय़ा प्रमाणात आहेत, असे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक ते परवाने घेतलेले नाहीत. ग्रामपंचायतींनीही या बेकायदेशीर कामासाठी परवानगी नाकारली आहे. परंतु, तरीसुद्धा या दगडखाणी सुरू आहेत, असेही माधव गाडगीळ यांनी स्पष्ट केले.