देशात करोनाचा वेगाने फैलाव होत असून, महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतही मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाचे एक लाख ८४ हजार ३७२ रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

गेल्या २४ तासांत करोनाने १,०२७ जणांचा बळी घेतला. गेल्या सहा महिन्यांतील करोनाबळींचा हा उच्चांक आहे. मृतांची एकूण संख्या एक लाख ७२ हजार ०८५ वर पोहोचली आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटी ३८ लाख ७३ हजार ८२५ वर पोहोचली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १३ लाखांहून अधिक झाली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ९.८४ टक्के आहे.

देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली  जात आहे. इतर राज्यांतही रुग्णवाढ झपाट्याने होत असून, गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात २०,५१२ नवे रुग्ण आढळले. याच कालावधीत तिथे ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगडमध्ये १५६ करोनाबळींची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये दैनंदिन रुग्णवाढीने १५ हजारांचा टप्पा ओलांडला.

मध्यप्रदेशात दिवसभरात ८,९९८ रुग्ण आढळले तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

देशात फेबु्रवारीअखेरपासून करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ नोंदवली जात आहे. सुरूवातीला एकूण रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे प्रमाण निम्म्याहून अधिक होते. मात्र, आता महाराष्ट्राबरोबरच उत्तरप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांत मोठी रुग्णवाढ होत आहे.