१९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणी न्यायालयाने ३४ वर्षांनंतर एकाला फाशीची तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी दिल्लीतील एका न्यायालयाने हत्येप्रकरणी दोषी ठरवत नरेश सहरावतला जन्मठेप तर यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मागील आठवड्यात न्यायालयाने याप्रकरणाशी संबंधित सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपला आदेश राखीव ठेवला होता.

शिक्षेवरील चर्चेदरम्यान सरकारी वकील आणि पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर बचावपक्षाकडून दयेची विनंती करण्यात आली होती. केंद्राच्या आदेशानंतर गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मागील आठवड्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांच्यासमोर दोषींचा गुन्हा गंभीर असल्याचे सांगत कट रचून हे कृत्य केल्याचे सांगितले होते. तसेच याप्रकरणी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

दुसरीकडे पीडित कुटुंबीयांकडून वरिष्ठ वकील एच एस फुल्का यांनीही एसआयटीच्या मागणीचे समर्थन केले होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे केवळ दंगल पीडितच नव्हे तर संपूर्ण जगभराची नजर या खटल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान या प्रकरणी हरदेव सिंगचा भाऊ संतोख सिंगने तक्रार नोंदवली होती. दिल्ली पोलिसांनी पुराव्याअभावी १९९४ मध्ये हे प्रकरण बंद केले होते. पण दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करुन हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले होते.

न्यायालयाने १ नोव्हेंबर १९८४ मध्ये महिलापूर परिसरात दोन शीख युवकांच्या हत्येप्रकरणी स्थानिक नरेश सहरावत आणि यशपाल सिंह यांना दोषी ठरवले होते. पीडित कुटुंबीयांच्या दुकानाची लुट करणे, दंगल करणे, दोन शीख युवकांना जिवंत जाळणे, मृतांच्या भावांवर जीवघेणा हल्ल्या केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अनेक शहरांमध्ये दंगल उसळली होती. त्यावेळी हा प्रकार घडला होता.