विशेष न्यायालयानं 2002मधल्या गोध्रा ट्रेन हत्याकांडप्रकरणी आणखी दोन जणांना दोषी ठरवलं आहे तर तीन जणांची मुक्तता केली आहे. दोषी आढळलेल्या दोघांना जन्पठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2002मध्ये कारसेवकांचा समावेश असलेल्या साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली होती त्यावेळी 59 कारसेवक ठार झाले होते. त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीचे व्रण अद्यापही मिटलेले नाहीत.

2015-16 मध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी पाच जणांना गोध्रा हत्याकांडाप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयासमोर सुनावणी झाली आणि तीन जणांची मुक्तता करण्यात आली तर दोघांना दोषी धरण्यात आले. फारूख भना व इम्रान उर्फ शेरू बाटिक असं दोषी गुन्हेगारांचं नाव आहे, तर हुसेन सुलेमान मोहम, कासम भामेदी व फारूख धांतिया असं मुक्तता करण्यात आलेल्यांची नावं आहेत. साबरमती ट्रेनच्या डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

गुजरात हायकोर्टानं याआधी 2017मध्ये 11 जणांच्या मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, तसेच अन्य 20 जणांची जन्मठेप कायम ठेवताना 63 जणांची सुटका करण्याचा निर्णयही कायम ठेवला होता. गुजरात सरकारने 63 जणांची सुटका करण्याच्या निर्णयविरोधात दाद मागितली होती, परंतु ही मागणी फेटाळण्यात आली होती. 2002 मध्ये 27 फेब्रुवारी रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 या कोचला आग लावण्यात आली होती. यामध्ये डब्यातले 59 कारसेवक जळून ठार झाले. ते अयोध्येवरून परत येत होते.

यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली व जवळपास एक हजार जणांचा बळी गेला. गोध्रा हत्याकांडाची विशेष तपास पथकानं चौकशी केली व मार्च 1, 2011 मध्ये अहवाल सादर केला. विशेष न्यायालयानं 31 जणांना दोषी धरलं तर 63 जणांना मुक्त केलं. 11 जणांना मृत्यूदंड देण्यात आला व अन्यांना जन्मठेप ठोठावण्यात आली होती. या 11 जणांची फाशी रद्द करत त्यांना जम्पठेप सुनावण्यात आली.