२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाने सुनावणी रोखण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालय याप्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार असल्यामुळे याप्रकरणात आम्ही दखल देणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कर्नल पुरोहित यांनी विशेष न्यायालयाद्वारे बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार (यूएपीए) आपल्या विरोधातील अभियोजन मंजुरीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रतिबंध लागू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, ३० ऑक्टोबर २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने संशयित पुरोहित आणि इतर व्यक्तींविरोधात खालच्या न्यायालयात आरोप निश्चित करण्यावर प्रतिबंधास नकार दिला होता.

दरम्यान, मालेगाव बॉम्ब स्फोटातील संशयित लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी विशेष न्यायालयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. २९ सप्टेंबर २००८ मध्ये एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात सहा व्यक्तींचा मृत्यू तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.