देशातील अॅप आधारित टॅक्सी सेवा क्षेत्रातील दोन मातब्बर कंपन्या समजल्या जात असलेल्या उबर आणि ओलाला गेल्या वर्षभरात लाखो चालकांनी रामराम केला आहे. जवळपास एक चतुर्थांश चालकांनी नफ्याचे प्रमाण घटल्याने ओला आणि उबरला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील जानेवारी-मार्च या तिमाहीत ओला आणि उबरकडे ५ लाख कॅब होत्या. मात्र यंदाच्या जानेवारी-मार्चमध्ये हा आकडा ३ लाख ८० हजारांवर आला आहे. वर्षभरात तब्बल १ लाख २० हजार कॅब ओला आणि उबरच्या सेवेतून बाहेर पडल्या आहेत. लाईव्ह मिंटने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

रेडसेर कन्स्लटिंग कंपनीच्या सर्वेक्षणानुसार ओला आणि उबरमध्ये काम करणारे अनेक कॅब चालक आता पर्यायी उत्पन्नाचे साधन शोधत आहेत. अनेक चालकांनी तर या व्यवसायातून बाहेर पडणेच पसंत केले आहे. व्यवसाय सोडण्याचा पर्याय नसलेल्या चालक काही समांतर संधीच्या शोधात आहे. कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या नफ्यात तब्बल ६० टक्क्यांनी घट झाल्याचे ओला आणि उबरच्या अनेक चालकांनी सांगितले आहे.

बंगळुरु आणि दिल्लीत उबर आणि ओला कॅब धारकांची संख्या सर्वाधिक आहे. येथील चालकांनी कंपन्यांविरोधात अनेकदा आंदोलने आणि निदर्शने केली आहेत. उत्पन्न घटत असल्याने चालकांकडून अनेकदा आंदोलन करण्यात आली असली, तरी त्याचा कोणताही उपयोग झालेला नाही. राज्य सरकारच्या वाहतूक विभागांनी ओला-उबर आणि चालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र या मध्यस्थीतून अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही.

ओला-उबरच्या चालकांचा प्रश्न कामगार कायद्याच्या अंतर्गत येतो. मात्र हे चालक ओला आणि उबरचे थेट कर्मचारी नसल्याने तांत्रिक प्रश्न निर्माण होतो. ओला आणि उबरचे चालक स्वखुशीने या सेवेशी जोडले गेले आहेत. महिन्याकाठी १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवा, अशा जाहिराती ओला आणि उबरकडून करण्यात आल्या होत्या. ‘सुरुवातीला कंपनीकडून टार्गेट देण्यात येत होते. मात्र त्यानंतर देण्यात येणारा परतावा कंपनीकडून कमी करण्यात आला,’ अशी व्यथा लाखो चालक व्यक्त करत आहेत.