गेल्या पाच वर्षांत देशभरातील १० भारतीय तंत्रज्ञान संस्थांतील (आयआयटी) २७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे माहिती अधिकार कायद्यातील विचारणेच्या उत्तरातून उघड झाले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आयआयटी मद्रास या यादीत पहिल्या क्रमांकावर असून, तेथील ७ विद्यार्थ्यांनी पाच वर्षांत आत्महत्या केल्या आहेत.

२०१४ ते २०१९ या कालावधीत आयआयटी मद्रासमधील ७, आयआयटी खडगपूरमधील ५, तर आयआयटी दिल्ली व आयआयटी हैदराबादमधील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या विचारणेच्या उत्तरात मंत्रालयाने २ डिसेंबरला कळवले आहे.

याच काळात आयआयटी मुंबई, आयआयटी गुवाहाटी व आयआयटी रुडकी येथील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनीही त्यांचे जीवन संपवले. याच कालावधीत वाराणसी येथील आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ), आयआयटी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) धनबाद आणि आयआयटी कानपूर येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांनेही हे टोकाचे पाऊल उचलले, असे या माहितीत नमूद करण्यात आले आहे. तथापि, आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्यामागील कारणांबाबत काहीही उत्तर देण्यात आलेले नाही. देशातील या प्रमुख तंत्रज्ञान संस्थांतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशीही विचारणा गौर यांनी केली होती.