बिहारमधील बेगूसराय येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. सिमारिया येथील गंगा घाटावरून स्नान करून परतणाऱ्या भाविकांमध्ये अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज (शनिवार) सकाळी  घडली. या चेंगराचेंगरीत किमान १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. सर्वांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिमारिया घाटावर अर्ध कुंभ सुरू आहे. कार्तिक पौर्णिमेसाठी तिथे भाविकांची मोठी गर्दी झाली असून त्याचवेळी ही दुर्घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या वारसदारांसाठी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.

हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला मोठे महत्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी गंगा स्नान करणे खूप चांगले असते. त्यानिमित्त बिहारमध्ये गंगा नदीच्या घाटावर लाखो भाविक एकत्र येतात.