भारत-चीन व्यापारामध्ये मोठया प्रमाणावर असमतोल आहे. आपण चीनकडून मोठया प्रमाणावर आयात करतो. पण त्यातुलनेत चीनला निर्यात करत नाही. व्यापारामध्ये अनेक वस्तुंसाठी आपण मोठया प्रमाणावर चीनवर अवलंबून आहोत. चीनवरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी आरआयएस या थिंक टँकने अभ्यास करुन काही चांगले पर्याय सुचवले आहेत.

चीनकडून भारत आयात करत असलेल्या वस्तूंमधील तीन चतु्र्थांश किंवा ३२७ वस्तू यांची पर्यायी आयात शक्य आहे. या ३२७ वस्तुंमध्ये मोबाइल फोन्स, टेलिकॉम उपकरणे, कॅमरा, सौर पॅनल, एसी, पेनिसिलन औषधांचा समावेश होतो. चीनकडून होत असललेल्या एकूण आयातीमध्ये या ३२७ वस्तुंचा तीन चतुर्थांश वाटा आहे. आरआयएसनुसार या ३२७ वस्तुंची चीन व्यतिरिक्त अन्य देशांकडून पर्यायी आयात शक्य आहे तसेच भारतातही याचे उत्पादन केले जाऊ शकते.

भारतात चीनमधून एकूण ४,०४४ उत्पादने आयात केली जातात. यात ३,३२६ अशी उत्पादने आहेत, ज्यात फार स्पर्धा नाहीय. पण ३२७ सेंसिटिव उत्पादने आहेत. एकूण आयातीमध्ये सेंसिटिव उत्पादने फक्त १० टक्के आहेत. ७६ टक्के सेंसिटिव प्रोडक्टमध्ये मशीन किंवा केमिकलचा समावेश होतो.

चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने मार्च महिन्यापासूनच पर्यायी आयातीचे मार्ग शोधायला सुरुवात केली. पण चीन सारखीच उत्पादने अन्यत्र मिळणार नाहीत याकडे अर्थशास्त्री आणि व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले. अलीकडच्या काही वर्षात चीन इलेक्ट्रॉनिक, रसायने आणि औषध निर्मिती क्षेत्रातील उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनला आहे. जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने सुरु केले. हे कारखाने फक्त तिथल्या बाजारपेठेला काबीज करण्याच्या उद्देशाने सुरु झालेले नाहीत तर चीनमधून या कंपन्या जगातील अन्य देशांना मालाची निर्यात करतात.