उत्तर वझिरिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या लढाऊ जेट विमानांमधून हल्ले घडवून ४० अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  या भागात अतिरेक्यांचे दडून बसण्याचे अनेक तळ असल्याचे सांगण्यात आले.
या तळांमधून अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी मीर अली या भागात बुधवारी मध्यरात्री हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत काही परकीय नागरिकांसह १५ अतिरेकी ठार झाल्याच्या वृत्तास अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. अतिरेक्यांकडे असलेला शस्त्रास्त्रांचा मोठा साठाही नष्ट करण्यात आला. स्थानिक प्रशासनास विश्वासात घेऊन ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी हल्लेसत्र सुरू करण्याचे ठरविल्यामुळे पाकिस्तानी जनतेचे त्यापासून रक्षण करण्यासाठी हे हवाई हल्ले करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. कारवाईच्या पहिल्या टप्प्यात हवाई हल्ल्यांची योजना आखण्यात आली. या पर्वतीय भागातील हवामानात सुधारणा झाल्यानंतर पुढील कारवाईची रूपरेषा आखण्यात येणार आहे.
तालिबान्यांच्या हिंसाचारास तोंड देण्यासंदर्भात गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वपक्षीय बैठक होऊन त्यामध्ये तालिबान्यांसमवेत चर्चा करण्याचे ठरल्यानंतरही झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४६० जण ठार झाले असून त्यामध्ये ३०८ नागरिकांचा समावेश आहे.