मध्य प्रदेशातील सिद्धी जिल्ह्य़ात एक बस मंगळवारी सकाळी पुलावरून कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात ४७ जण मृत्युमुखी पडले असून त्यात २१ महिलांचा समावेश आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरा शोधकार्य तात्पुरते थांबविण्यात आले.

एकूण ४७ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असल्याचे विभागीय आयुक्त राजेश जैन यांनी म्हटले आहे. त्यात २१ महिला व दोन बालकांचा समावेश आहे. बनसागर कालव्यातून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अपघाताची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकृतदर्शनी ५४ प्रवासी बसमधून प्रवास करीत होते. सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. सात प्रवासी पोहत किनाऱ्याला लागले तर ४७ मृतदेह सापडले आहेत. ४४ जणांची ओळख पटली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रिवाचे पोलीस महानिरीक्षक जोगा यांनी अपघाताच्या ठिकाणाहून १८ मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले होते. सिद्धी जिल्ह्य़ात पाटणा खेडय़ापासून ८०   कि .मी. अंतरावर बस  कालव्यात कोसळली.