पाकिस्तानी हल्ल्यात पाच जवान शहीद, भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केला. या हल्ल्यात एका कॅप्टनसह लष्कराचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी शहीद झाला, तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे आठ सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानी लष्कराचे तंबू, खंदक आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे दर्शवणारी चित्रफित भारतीय लष्कराने प्रसारित केली आहे.

नियंत्रण रेषेजवळच्या डावर, केरन, उरी आणि नौगामसह अनेक क्षेत्रांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैनिकांनी तोफांचा मारा आणि गोळीबार करून जाणीवपूर्वक नागरी वसाहतींना लक्ष्य केले, अशी माहिती संरक्षण दलाचे श्रीनगर येथील प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. पाकिस्तानच्या या हल्ल्यात लष्कराचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक उपनिरीक्षक शहीद झाले, तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात सुरक्षा दलांचे चार जवान आणि आठ नागरिक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या गोळीबारात हाजीपीर क्षेत्रात ‘बीएसएफ’चा एक जवान शहीद झाला. नवी दिल्लीतील ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ बारामुल्ला येथे उपनिरीक्षक राकेश डोवाल (३९) शहीद झाले. त्याच क्षेत्रात वसू राजा हा ‘बीएसएफ’चा जवान गंभीर जखमी झाला आहे. राकेश डोवाल यांनी देशाच्या सीमासंरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली, अशी भावना ‘बीएसएफ’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

उरी क्षेत्रातील अनेक ठिकाणांव्यतिरिक्त बांदीपोरा जिल्ह्य़ाच्या गुरेझ क्षेत्रातील इझमार्ग आणि कुपवाडा जिल्ह्य़ातील केरन क्षेत्रातही पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग करून तोफांचा मारा आणि गोळीबार केल्याची माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.

पाकिस्तानी सैनिकांनी पँूछ जिल्ह्य़ात शुक्रवारी दुपारी पावणे दोन ते पावणे तीनच्या सुमारास दोनदा शस्त्रसंधीचा भंग करून छोटय़ा तोफांचा मारा केला आणि गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्या, असे लष्कराच्या जम्मूतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानचा लॉन्च पॅड उद्ध्वस्त

पाकिस्तानच्या हल्ल्यास भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे काही सैनिक ठार झाल्याचे, तसेच त्यांच्या लष्कराचे अनेक बंकर्स आणि दहशतवाद्यांचे लॉन्च पॅडही उद्ध्वस्त झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. त्याबाबतचा एक चित्रफितही भारतीय लष्कराने प्रदर्शित केली.

घुसखोरीचा दुसरा प्रयत्न

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्य़ातील केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेनजीक संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या. घुसखोरीचा हा संशयास्पद प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. घुसखोरीचा हा या आठवडय़ातील दुसरा प्रयत्न होता. त्या आधी ७-८ नोव्हेंबरच्या रात्री मचिलमधील घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला होता. त्यात तीन दहशतवादीही ठार झाले होते, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले.

राज्यातील दोन जवानांना वीरमरण

नागपूर/कोल्हापूर: जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने सीमेवर केलेल्या गोळीबारात शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले. त्यापैकी ऋषिकेश जोंधळे (वय २०) हे कोल्हापूर जिल्ह्य़ातील आजरा येथील, तर भूषण रमेश सतई हे नागपूरमधील काटोल येथील आहेत. हे दोघेही जवान ‘मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होते. ऋषिकेश २०१८मध्ये लष्करात दाखल झाले होते.

जवानांच्या असामान्य धैर्याबद्दल कृतज्ञता आहे, मात्र कृतज्ञतेच्या जाणीवेला केवळ शब्द न्याय देऊ शकत नाहीत. म्हणून जवानांना मानवंदना देण्यासाठी प्रत्येकाने एक दीप प्रज्वलित करावा.  नरेंद्र मोदी, पंतप्रधान