वातावरणातील आर्द्रता १ टक्का कमी झाली, तर कोविड १९ रुग्णांच्या प्रमाणात सहा टक्के वाढ होते असे एका अभ्यासात म्हटले आहे. स्थानिक हवामान व करोनाचा प्रसार या विषयावर हे संशोधन करण्यात आले असून त्यात आर्द्रतेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे.

ट्रान्सबाउंड्री अँड इमर्जिग डिसीजेस या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे की, दक्षिण अर्धगोलार्धातील हवामान व कोविड १९ प्रसार यांचा जवळचा संबंध आहे. याचा अर्थ या रोगाचे स्वरूप हवामानानुसार बदलू शकते. कोविड १९ हा मोसमी रोग आहे व तो कमी आर्द्रतेच्या काळात वारंवार वाढून त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. याचा अर्थ थंडीच्या काळात हा रोग वाढू शकतो, असे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील साथरोगतज्ञ मायकेल वॉर्ड यांनी म्हटले आहे, पण याच शोधनिबंधात पुढे म्हटले आहे की, दक्षिण अर्धगोलार्धात थंडीच्या दिवसात हा रोग का वाढण्याची शक्यता आहे याचा उलगडा करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. आर्द्रता कमी झाल्यास हा रोग वाढत जातो पण कोविड १९ प्रसार नेमक्या किती आर्द्रतेला सुरू होतो किंवा वाढतो हे नेमके सांगता आलेले नाही. हाँगकाँग व चीन या देशातील २००२-२००३ मधील  सार्स सीओव्ही साथ व सौदी अरेबियातील मर्स- सीओव्ही (मिडल ईस्ट रेस्पेरेटरी सिंड्रोम) या रोगांचा संबंध आर्द्रता किंवा हवामानाशी कशाप्रकारे आहे हे अजून माहिती नाही.

चीनमध्ये अलीकडेच एक अभ्यास करण्यात आला होता. त्यात तापमानाचा कोविड १९ प्रसाराशी संबंध असल्याचे म्हटले होते. वॉर्ड यांच्या मते चीन, युरोप, उत्तर अमेरिका या देशात करोनाची साथ थंडीत घडून आली त्यामुळे कोविड १९ चा प्रसार व हवामान यांचा संबंध ऑस्ट्रेलियातील उन्हाळ्यात कसा राहील हे पाहणे महत्त्वाचे आहे.

आर्द्रता कमी असेल तर कोविड १९ चा प्रसार होतो त्याचा कमी तापमानाशी संबंध नाही. त्यामुळे थंडीत ऑस्ट्रेलियात या रोगाचा प्रसार होऊ शकतो. उत्तर अर्धगोलार्धात कमी आर्द्रता असलेल्या भागात म्हणजे अगदी उन्हाळ्याच्या काही महिन्यातही कोविड १९ प्रसाराचा धोका आहे.

नेमके काय होते?

आर्द्रता कमी असल्याने नेमके काय होते याचे स्पष्टीकरण करताना त्यांनी सांगितले की, त्यावेळी हवा कोरडी असते त्यामुळे हवेतील कण लहान असतात. जेव्हा आपण शिंकतो किंवा खोकतो तेव्हा संसर्ग कण हवेत जास्त काळ राहतात. त्यामुळे ते लोकांपर्यंत जास्त पोहोचतात. जेव्हा हवा आर्द्र असते तेव्हा हवेतील कण मोठे व जड होतात ते खाली पडून पृष्ठभागावर बसतात.