पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. या आंदोलनात पाच जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून गुजराती बांधवांशी संवाद साधत आंदोलन थांबवून चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन पटेल समाजाच्या नेत्यांना केले आहे.
आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुस्थितीत असलेल्या पटेल समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मंगळवारी हार्दिक पटेल याने येथील जीएमडीसी मैदानावर घेतलेल्या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर हार्दिकला पोलिसांनी ताब्यात घेतले व चौकशीनंतर सोडून दिले. मात्र, त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनाचे लोण अहमदाबादपासून सुरत, राजकोट, मेहसाणा, पाटण, पालनपूर, उंझा, विसनगर व जामनगर आदी भागांत पसरले. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. आंदोलन चिघळल्याच्या पाश्र्वभूमीवर लष्कराला पाचारण करण्यात आले असून अहमदाबादेतील पाच मार्गावर लष्कर तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, निमलष्करी दलाचे पाच हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबईहून सुटणाऱ्या १२ गाडय़ा रद्द करण्यात आल्या.
बस पेटवल्या
उत्तर गुजरातेत बहुतेक सर्व शहरांत बंद पाळण्यात आला. वडोदरा येथे शाळा, महाविद्यालये बंद होती. अहमदाबाद येथे हिंसेच्या ५० घटना घडल्या असून त्यात बस जाळणे, पोलीस चौक्यांवर हल्ले, खासगी वाहने पेटवणे असे प्रकार करण्यात आले.
राज्य व केंद्रातील सरकारांच्या आदेशानुसार पोलीस वागत आहेत. आमचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांनी हिंसेचा अवलंब केला आहे. येत्या काही दिवसांत आंदोलन तीव्र करू.
हार्दिक पटेल, आंदोलनाचा नेता
अहमदाबादेत मंगळवारी झालेल्या जनसभेनंतर त्यावर लाठीमार करण्याचे आदेश गुजरात सरकारने दिले नव्हते. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आनंदी पटेल, मुख्यमंत्री-गुजरात