भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ८३६५ रुग्ण आढळले आहेत. करोना संकटाचा सामना करणाऱ्या भारतात गेल्या आठ महिन्यातील ही सर्वात कमी संख्या आहे. भारतात सध्या लसीकरण मोहिम सुरु असून जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक वेगाने नागरिकांचं लसीकरण केलं जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये सांगितलं होतं.

१६ जानेवारीला भारतातील लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून आतापर्यंत ३९ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याआधी २ जूनला सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी ८१७१ करोना रुग्ण आढळले होते.

गतवर्षी ३० जानेवारीला करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६६ हजार २४५ जण करोना रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वात पहिला करोना रुग्ण आढळला होता. चीनमधील वुहान येथून परतलेल्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाला होता. वुहान येथूनच करोनाचा फैलाव झाल्याचा दावा वारंवार केला जात आहे.

एका वर्षात १ कोटी रुग्ण करोनामधून बरे झाले आहेत तर १ लाख ५४ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देशात करोनामुळे ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी १२ मे रोजी सर्वात कमी ८७ जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरपासून भारतात करोना रुग्णसंख्या सतत कमी होत आहे.