तीनशेसाठ टेराबाइट माहिती अब्जावधी वर्षे सुरक्षित ठेवण्याची क्षमता

वैज्ञानिकांनी पंचमितीची डिजिटल डाटा डिस्क (माहिती साठवण तबकडी) तयार केली असून, तिची तुलना ‘सुपरमॅन मेमरी क्रिस्टल’ या सुपरमॅनवर आधारित चित्रपटात दाखवलेल्या माहिती साठवण तबकडय़ांशी करण्यात आली आहे. या डिस्कची माहिती साठवणक्षमता ३६० टेराबाइटइतकी आहे. विशेष म्हणजे ही डिस्क अब्जावधी वर्षे खराब न होता त्यातील माहितीही राहू शकते.

अतिशय सुटसुटीत असे माहिती साठवणीचे हे साधन असून, या डिस्कचा वापर राष्ट्रीय संग्रहालये, वाचनालये करू शकतील, त्यात बरीच माहिती साठवता येऊ शकते. नॅनोरचना असलेल्या काचेची ही तबकडी बनवण्यात आली असून, ब्रिटनमधील साऊथहॅम्पटन विद्यापीठाच्या ऑप्टोइलेक्ट्रॉनिक रीसर्च सेंटरने ती विकसित केली आहे. या तबकडीवरील माहिती फेमटोसेकंड लेसर रायटिंग पद्धतीने लिहिली किंवा वाचली जाते.

या माहिती साठवण तबकडीवर ३६० टेराबाइट इतकी माहिती साठवता येते व ती एक हजार अंश तापमानालाही टिकून राहते. कक्ष तापमानाला ही तबकडी कधीच खराब होत नाही. १९० अंश तापमानाला ती १३.८ अब्ज वर्षे टिकून राहू शकते. या संशोधामुळे माहिती साठवणीचे शाश्वत तंत्रज्ञान सापडले आहे.

२०१३मध्ये या तंत्रज्ञानाचा प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला व त्यात पंचमिती तबकडीवर ३०० किलोबाइट माहिती टेक्स्टफाइलच्या रूपात साठवण्यात आली. मानवी हक्कांचा जाहीरनामा, न्यूटनचा ऑप्टिक ग्रंथ, मॅग्नाकार्टा, किंग्ज जेम्स बायबल हे यात अंकीय पद्धतीने साठवण्यात आले. लेसर तंत्रज्ञानाच्या मदतीने या माहितीची साठवण करण्यात आली व नॅनोरचना असलेल्या बिंदूंच्या त्रिस्तरीय रचनेत ही माहिती संग्रहित करण्यात आली. त्या थरांमधील अंतर हे पाच मायक्रोमीटर असून तो मीटरचा एक दशलक्षांशवा भाग आहे. नॅनोग्लास रचनांमुळे काचेतून प्रकाश प्रवास करतो तेव्हा त्यात बदल होतात व प्रकाशाचे ध्रुवीकरण बदलले जाऊन प्रकाशीय सूक्ष्मदर्शी व ध्रुवीय प्रकाश यंत्राने माहिती वाचता येते व पोलॅरॉइड गॉगल्समध्ये हेच तंत्र वापरलेले असते. ही तबकडी म्हणजे सुपरमॅन मेमरी क्रिस्टल असून, त्याची तुलना सुपरमॅन चित्रपटात वापरलेल्या मेमरी क्रिस्टल्स म्हणजे स्मृती स्फटिकांशी केली गेली आहे. या स्वरचित नॅनोरचना क्वार्ट्झ स्फटिकात गुंफल्या जातात व त्यामध्ये माहितीची साठवण केली जाते. माहितीचे सांकेतीकरण पाच मितींनी केले जाते. यात इतर नेहमीच्या तीन मितींचा समावेश आहे. कागदपत्रे किंवा माहिती साठवणुकीसाठी अशाप्रकारचे तंत्र निर्माण करण्यात आले, त्यामुळे ही माहिती पुढील पिढीसाठी सुरक्षित राहील असे पीटर कॅझनस्की यांनी सांगितले. मानवी संस्कृतीचे शेवटचे पुरावेही त्यात राहू शकतील, आपण जे शिकलो ते विस्मृतीत जाण्याचा धोकाही टळेल असे त्यांनी स्पष्ट केले.