ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी सेवेत असलेल्या मेजर जनरल दर्जाच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत.
लष्कराच्या सेवा विभागातील (आर्मी सव्र्हिस कोअर) मेजर जनरल अशोक कुमार आणि दारूगोळा विभागातील (आर्मी ऑर्डनन्स कोअर) मेजर जनरल एस. एस. लांबा अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. विरोधाभासाची बाब अशी की, या दोघांनाही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गेल्या वर्षी अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले होते.
गेल्या वर्षी लष्करातील लेफ्टनंट जनरल दर्जाची तीन पदे भरण्यासाठी विशेष बढती मंडळाची (स्पेशल प्रमोशन बोर्ड) बैठक भरली होती. त्यात लष्करातील ३३ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्जाचा विचार करण्यात आला. या बैठकीनंतर काही अधिकाऱ्यांची नावे मंडळाने अंतिम विचारार्थ संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली होती. मात्र त्यापैकी काही अधिकाऱ्यांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. परिणामी संरक्षण मंत्रालयाने या अधिकाऱ्यांच्या बढतीला स्थगिती दिली होती. यानंतर खुद्द संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.