क्राईम शोमधील एका सीनचं अनुकरण करत असताना गळफास लागून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील हापूर येथे ही घटना घडली आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे मित्र मैत्रीणही होते. पण आपल्या मैत्रिणीचा मृत्यू झाल्याचं पाहून ते घाबरले आणि तेथून पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित मुलीच्या एका मित्राने पोलिसांना सांगितल्यानुसार, ‘पालक तिच्यावर ओरडले असल्या कारणाने ती रडत आमच्या घरी आली होती. आम्ही घरी बसून क्राईम शो पाहितला आणि मग चोर – पोलीस खेळायचं ठरवलं. खेळत असताना चुकून गळफास लागला आणि तिचा मृत्यू झाला’.

‘मुलगी जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा ती नाराज होती. घरातून बाहेर पडल्यानंतर ती शेजा-यांच्या घरात गेली’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. क्राईम शो पाहत असताना त्यात वारंवार गळफास लावल्याचा सीन दाखवण्यात येत होता. ‘वारंवार दिसणारा त्या गळफासाच्या सीनचं अनुकरण करायचं मुलांनी ठरवलं. पीडित मुलगी एका बादलीवर चढली, गळ्याभोवती दुपट्टा बांधला आणि गळफास घेतला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तिचा मृत्यू झालं असल्याचं लक्षात येताच इतरांनी घाबरुन तेथून पळ काढला. ‘ही अत्यंत दुर्देवी घटना असल्याचं’, पोलिसांनी सांगितलं आहे. लहान मुलाने आत्महत्या केल्याची ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे. परिक्षेत कॉपी करताना पकडल्यामुळे आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती.