कर्नाटकातील राजकीय पेच सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर राजकीय नाट्य संपुष्टात आले असे वाटत असतानाचा काँग्रेस-जेडीएस आघाडीसमोर आता नवी समस्या उद्धभवली आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या संघटनांनी उपमुख्यमंत्रीपदी लिंगायत नेत्याची निवड करण्याची मागणी केली होती. परंतु, आता यामध्ये काही मुस्लीम संघटनांनीही उडी घेतली असून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोशन बेग किंवा मुस्लीम समाजातील दुसऱ्या नेत्याची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्याची आग्रही मागणी केली आहे. या मागणीमुळे आता काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, जेडीएसचे कुमारस्वामी देवेगौडा हे उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

रोशन बेग हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकतर बेग यांना संधी द्यावी किंवा पक्षातील दुसऱ्या ज्येष्ठ मुस्लीम नेत्याची नियुक्ती करावी अशी मागणी मुस्लीम संघटनेने केली आहे.

नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्मावरून मोठे वादळ निर्माण झाले होते. काँग्रेसने ऐन निवडणुकीवेळी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याची शिफारस केली होती. तर भाजपाने याला विरोध केला होता. तसेच राज्यातील लिंगायत समाजातही दोन गट पडले होते. काँग्रेसला या निर्णयाचा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. दरम्यान, काँग्रेसने मुख्यमंत्रीपद जेडीएसकडे दिले. त्यामुळे जेडीएसचे प्रमुख नेते कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कुमारस्वामी देवेगौडा हे वक्कलिगा समाजाचे आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी लिंगायत समाजाला संधी देण्याची मागणी करण्यात आली. अनेक लिंगायत संघटनांनी याप्रकरणी काँग्रेस नेतृत्वाकडे निवेदनेही दिली. परंतु, आता मुस्लीम समाजानेही उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे.

दोन्ही समाजाकडून मागणी करण्यात आल्यामुळे काँग्रेस नेतृत्व आता अडचणीत आले आहे. दोन्ही समाजाला नाराज करणे पक्षाला धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे कदाचित दोन उपमुख्यमंत्री नेमले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सत्ता स्थापण्याची कामगिरी लिलया पार पाडणारी काँग्रेस आता ही समस्या कशी सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.