काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची सुरक्षाव्यवस्था भेदण्याचा प्रकार नुकताच समोर आल्यानंतर, आज चक्क संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वाहनांचा ताफा संसद परिसरात एका व्यक्तीने भर रस्त्यात अडवल्याची घटना घडली. याप्रकारामुळे संरक्षणमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

संसद परिसरातून जाणाऱ्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर एक व्यक्ती अचानकपणे आली व त्याने ही वाहनं अडवली. या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्था देखील काही क्षण गडबडली मात्र तातत्काळ या व्यक्तीला बाजूला करण्यात आले व त्यानंतर सर्व वाहनं पुढे गेली. या प्रकारानंतर या व्यक्तीस सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा, पंतप्रधान मोदी यांची आपणास भेट घ्यायची असल्याचे त्याने सांगितले. मात्र या घटनेमुळे सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या लोधी इस्टेट भागातील घरातील पोर्चपर्यंत सातजण एका मोटारीत बसून पोहचले होते, एवढेच नाहीतर त्यांनी प्रियंका यांना भेटून छायाचित्र काढण्यासाठी विनंती देखील केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. २६ नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेच्या संदर्भात प्रियंका यांच्या कार्यालयाने सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीचा मुद्दा केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) उपस्थित केला असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.