पोटगी देताना एका महाशयांनी त्रास देण्याच्या हेतूने पत्नीला चक्क १६ हजाराची चिल्लर दिली. पतीने सोडून दिलेल्या महिलेने त्याला न्यायालयात खेचलं होतं. आता एवढी मोठी रक्कम मोजायची म्हणजे वेळ तर जाणारच. महिलेला आणि तिच्या वकिलाला हे चिल्लर मोजण्यासाठी तब्बल एक तास लागला. यासोबत नऊ हजारांच्या नोटादेखील होत्या.

पतीला आपल्या पत्नीला ५० हजार रुपये द्यायचे होते. न्यायालयात पोहोचला तेव्हा त्याने सोबत २५ हजार रुपये आणले होते. यामधील १६ हजार रुपये चिल्लर होते. यात पाच आणि १० रुपयांची नाणी होती. महिलेने पिशवी पाहताच ती स्विकारण्यास नकार दिला. पतीने मात्र आपण कष्ट करुन हे पैसे कमावले असल्याचं सांगत वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर न्यायालयाने मध्यस्थी केल्यानंतर महिला तयार झाली. महिलेचे वकिल किशोर जमनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक तास ते चिल्लर मोजत होते.

वकिलाची चिंधीगिरी! पत्नीला पोटगी म्हणून दिली २५ हजारांची चिल्लर

याआधीही अशीच एक घटना घडली होती. पंजाब हरयाणा उच्च न्यायालयातील वकिलानं आपल्या पत्नीला पोटगी म्हणून चक्क २५ हजारांची चिल्लर बॅगेत भरून दिली होती. १ आणि २ रुपयांच्या नाण्यांनी भरलेली बॅग त्यानं पत्नीकडे दिली होती. दोन महिन्यांपासून पतीनं पोटगी दिली नसल्याचा आरोप करत तिनं न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायलयानं तातडीनं दोन महिन्यांच्या पोटगीची रक्कम म्हणजे ५० हजार रुपये तिला देण्याचे आदेश दिला होता. मात्र पेशानं वकील असलेल्या या व्यक्तीनं चिल्लर पत्नीच्या पुढ्यात ठेवली.