विमान प्रवासात एका प्रवाशाने चक्क आपातकालीन दरवाजा उघडून सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची घटना समोर आली आहे. गोएअर विमानात हा प्रकार घडला आहे. प्रवाशाने शौचालयाचा दरवाजा समजून आपातकालीन दरवाजा उघडला होता. गोएअरचं G8-149 हे विमान पाटणाच्या दिशेने चाललं होतं. विमानात एकूण 150 प्रवासी प्रवास करत होते. विमानाचं लँडिंग होताच सीआयएसएफने प्रवाशाला पाटणा विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी राजस्थानमधील अजमेर येथे एका खासगी बँकेत कामाला असून नवी दिल्लीहून त्याने प्रवास सुरु केला होता. विमानातील एका अन्य प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, तो प्रवासी आपल्या जागेवरुन उठला आणि थेट दरवाजाकडे गेला. जेव्हा त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही प्रवासी आरडाओरड करु लागले, तर काहींनी त्याला पकडून ठेवलं.

यावेळी झालेल्या झटापटीत काही प्रवासी जखमी झाले. गोएअरमधील कर्मचाऱ्याने घटनेला दुजोरा दिला आहे. सीआयएसएफ कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाने रेअर गेट उघडला होता, मात्र केबिन प्रेशरमुळे दरवाजा उघडू शकला नाही. सह-प्रवाशांनी वेळीत गेट बंद केला आणि नंतर क्रू मेम्बर्सना कळवलं.

चौकशीदरम्यान प्रवाशाने आपण पहिल्यांदा विमान प्रवास करत असून चुकून दरवाजा उघडला असल्याचं सांगितलं. पोलिसांनी चौकशीनंतर प्रवाशाला सोडून दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A passenger opens flight door mistaking loo
First published on: 26-09-2018 at 12:40 IST