भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता पुन्हा एकदा देशातील जनतेला संबोधित केलं. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. यावेळी बोलत असताना मोदींनी अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसत नसल्याची खंत मोदींनी व्यक्त केली.

आणखी वाचा- अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला : पंतप्रधान

आपल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदींनी एका देशाच्या पंतप्रधानांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना १३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असं सांगितलं. यानंतर हे पंतप्रधान नेमके कोणत्या देशाचे आहेत याबद्दल सर्वांमध्ये उत्सुकता होती. तर मोदींच्या भाषणात उल्लेख झालेले पंतप्रधान आहेत बल्गेरिया या देशाचे.

काय झालं होतं नेमकं??

बल्गेरियाचे पंतप्रधान बॉयस्को बोरिस्कोव्ह हे एका चर्चमध्ये भेटीसाठी गेले होते. यादरम्यान बॉयस्को यांनी मास्क लावलेला नव्हता, त्यामुळे आपल्याच सरकारच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बॉयस्को यांनी ३०० लेव्ह्ज (बल्गेरियन चलन) ((भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १३ हजार)) एवढा दंड भरला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लेगेरियाच्या आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या चर्चभेटीआधी, उपस्थित व्यक्तींना मास्क घालणं बंधनकारक केलं होतं. नियमांचं पालन न करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येईल असंही जाहीर करण्यात आलं होतं. मात्र बल्गेरियाचे पंतप्रधान स्वतःचं मास्क घालण्यास विसरल्यामुळे त्यांनी स्वतः दंड भरला होता.

आणखी वाचा- सरपंच असो किंवा पंतप्रधान नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही – नरेंद्र मोदी

यावेळी आपल्या भाषणात बोलत असताना मोदींनी, लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्सिंग ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व नियम आपण पाळत होतो. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये काही लोकं हे नियम पाळत नसल्याचं पहायला मिळतंय. काही लोकं सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालून जाणं टाळत आहेत. १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, त्याला नागरिकांनीही साथ द्यायला हवी. गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती.