पती सीसीटीव्ही आणि छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याने वैतागलेल्या पत्नीने संतापाच्या भरात पतीच्या डोक्यात बॅट घातल्याची घटना समोर आली आहे. पत्नी आपला प्रत्येक मेसेज आणि कॉल ट्रॅक करत असल्याचा संशय असल्याने पतीने २२ छुपे कॅमेरे लावत पत्नीवर नजर ठेवली होती. पतीने खासगी गुप्तहेराच्या माध्यमातून तसंच वेगवेगळ्या ठिकाणी छुपे कॅमेरे लावत पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली होती. पण अशा पद्धतीने आपल्यावर पाळत ठेवल्याने पत्नीने वैतागून पतीच्या डोक्यात बॅट घातली.

आपल्या पतीच्या संशयी वृत्तीमुळे पत्नीने अखेर घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. यादरम्यान पतीने पत्नीने केलेल्या हल्ल्यामुळे आपण आता पहिल्यासारखे चांगले दिसत नाही असं म्हटलं आहे. दांपत्याची भेट मात्र एकदम रोमॅण्टिक पद्धतीने झाली होती. जुलै २००७ रोजी सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारे सुदर्शन मुलगी पाहण्यासाठी कुटुंबासोबत गेले होते. पण मुलीची छोटी बहिण त्यांना आवडली. पण ती अजून कॉलेजमध्ये शिकत असल्याने कुटुंबीयांनी नकार दिला होता.

पण सुदर्शन यांनी हट्ट सोडला नाही आणि अखेर २०१० मध्ये ११ वर्षांचं अंतर असतानाही दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. पण यानंतर सुदर्शन यांनी पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. अनेकदा कामावर सुट्टी घेऊनही सुदर्शन पत्नीवर पाळत ठेऊ लागला होता.

‘त्याने घरात छुपे कॅमरे लावले होते. किचमध्येही कॅमेरे लावून मोबाइलशी अॅपच्या माध्यमातून जोडले होते. तो सतत पत्नीवर लक्ष ठेवून होता’, अशी माहिती बंगळुरु पोलीस आयुक्तालयातील महिला हेल्पलाइनच्या वरिष्ठ सल्लागार बी एस सरस्वती यांनी दिली आहे.

सुदर्शन याने पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी आपल्या एका नातेवाईकाला सांगितलं होतं. नातेवाईक व्यस्त असताना तो स्वत: पत्नीचा पाठलाग करत असे. यासाठी त्याने एक कॅमेराही विकत घेतला होता. पण अनेकदा प्रयत्न करुनही त्याच्या हाती काही लागत नव्हतं.

वर्षाच्या सुरुवातील सुदर्शन याने पत्नीला मोबाइल गिफ्ट केला. पतीच्या स्वभावात बदल झाला असावा असं वाटल्याने पत्नीने गिफ्ट स्विकारलं. पण मोबाइलमध्ये छुपा कॅमेरा बसवला आहे याची कल्पना तिला नव्हती. यानंतर सुदर्शनने पत्नीचे मेसेज, कॉल तपासण्यास सुरुवात केली.

एप्रिल महिन्यात सुदर्शन याने पत्नीसमोर एका तरुणाची भेट घेतल्याचा फोटो दाखवत जाब विचारला. तो तरुणी पत्नीचा भाचा आहे याची कल्पना त्याला नव्हती. मात्र पतीच्या या संशयी स्वभावामुळे चिडलेल्या पत्नीने मुलाची बॅट घेतली आणि पतीच्या डोक्यात घातली.