टॅक्सीचालकाने अंगावर गाडी घातल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. टॅक्सी चालकाने तरुणाच्या अंगावर गाडी घातल्यानंतर जवळपास दोन किमीपर्यंत त्याला फरफटत नेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आपल्या मित्रांसोबत स्कुटीवरुन जात असताना टॅक्सीने त्यांना धडक दिली. यावेळी तरुणाने त्याला थांबण्याचा प्रयत्न केला चालकाने टॅक्सी अंगावर घातली. रविवारी संपूर्ण देशभरात गणपती विसर्जन करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

राहुल आपल्या दोन मित्रांसोबत गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. पूर्व दिल्लीमधील यमुना येथे विसर्जनासाठी ते चालले होते. पांडव नगर परिसरात टॅक्सी चालकाने त्यांच्या स्कुटीला धडक दिल्याने त्यांचा तोल गेला.

जेव्हा राहुल याने टॅक्सीसमोर उभं राहून थांबण्यास सांगितलं तेव्हा चालकाने थेट त्यांच्या अंगावरच टॅक्सी घातली. जवळपास दोन किमीपर्यंत चालकाने त्याला फरफटत नेलं. घटनेनंतर उपस्थित लोकांनी टॅक्सीचा पाठलाग केला. रस्त्यात त्यांन राहुल जखमी अवस्थेत पडलेला दिसला.

‘राहुल पांडव नगरचा रहिवासी असून एका खासगी कंपनीत काम करतो. त्याला रुग्णालयात नेलं असता मृत घोषित करण्यात आलं’, अशी माहिती उपआयुक्त पंकज कुमार सिंह यांनी दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरु आहे.