वरीष्ठ टीव्ही पत्रकार आणि आज तक वाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे आज सकाळी निधन झालं. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोहित सरदाना हे झी न्यूजसोबत होते. २०१७मध्ये त्यांनी झी न्यूज सोडून आजतकमध्ये आपल्या प्रसारमाध्यमातील प्रवासाला सुरुवात केली. २०१८मध्ये त्यांना पत्रकारितेतील मानाच्या गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २४ एप्रिल रोजी रोहित सरदाना यांनी स्वत:च आपल्याला करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं.

 

देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देकील रोहित सरदाना यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

“हिंदी मीडिया जगतात फार कमी कालावधीमध्ये आपली ओळख निर्माण करणारे पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनामुळे मी स्तब्ध झालो आहे. तो प्रचंड प्रतिभाशाली आणि प्रभावी पत्रकार होते. त्यांच्या निधनामुळे माध्यम विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. माझ्या संवेदना त्यांच्या परिवारासोबत आहेत”, असं राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

त्यांच्या निधनानंतर माध्यम विश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.