गोव्यात आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढत असल्याचे वृत्त फेटाळून लावताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्यात आपचे अस्तित्व नगण्य असल्याचे म्हटले आहे. पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आप मतदारांना आकर्षित करू शकणार नसल्याचेही ते म्हणाले.
आपचे नेते आशीष खेतान यांनी गोव्यात आप निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे म्हटले होते. अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात दोन-तीन महिने सभा घेतल्या तरी ते येथील मतदारांना प्रभावित करू शकणार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पार्सेकर बोलत होते. गोव्यातील नागरिक अतिशय प्रगल्भ आहेत. ते जाहिरातबाजीला भुलणार नाहीत. त्यामुळे पुढील गोवा विधानसभा निवडणुकीत आपला मते मिळणार नाहीत, असे पार्सेकर म्हणाले. आम आदमी पक्षाला कमी लेखत नसून त्यांना अवास्तव महत्त्व देण्याचीही गरज नसल्याचे पार्सेकर म्हणाले. आपने गोव्यातील निवडणुकीसाठी ४० उमेदवार निश्चित केले असून आपचे सरकार गोव्यात स्थापन होईल, असा विश्वास खेतान यांनी व्यक्त केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 12:06 am