प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष खासदार भगवंत मान यांनी दारू सोडण्याची घोषणा केली आहे. याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्याचबरोबर पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रिट्विट करत याला दुजोरा दिला आहे.

मनीष सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बर्नाला रॅलीत भगवंत मान यांची घोषणा- १ जानेवारीपासून दारूला हात न लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. तन-मन-धनाने पंजाबच्या जनतेच्या सेवेसाठी व्यतीत करेन, असे त्यांनी व्यासपीठावर आपली आई आणि पंजाबच्या जनतेसमोर वचन दिले आहे. दारूच्या नशेत संसदेत आणि जाहीर सभेत गेल्याचा भगवंत मान यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या दारूच्या व्यसनामुळे पक्षाला अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागला आहे.

केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपल्या आईचा हात पकडून मान यांनी रॅलीत म्हटले की, माझे राजकीय विरोधक नेहमी माझ्याविरोधात आरोप करतात की, भगवंत मान दारू पितो. तो दिवस-रात्र दारूच्या नशेत असतो. मी जेव्हाही माझे स्वत:चे जुने व्हिडिओ पाहतो, तेव्हा मी खूप दु:खी होत असत. मला बदनाम केले जात. आता १ जानेवारीपासून मी दारू सोडली आहे. मला आशा आहे की, आयुष्यात मी पुन्हा दारूला हात लावणार नाही.

मी हे मान्य करतो की, मी कधी-कधी दारू घेत असत. पण माझ्या राजकीय विरोधकांनी मला बदनाम केले. आज माझी आई येथे आहे. मला तिने म्हटले होते की, टीव्हीवर मला बदनाम केले जाते. तिने मला दारू सोडण्यास सांगितले. आता ते लोक मला बदनाम करू शकत नाहीत, असेही मान यांनी म्हटले.