आमिर खानचे पंतप्रधानांना आवाहन

भारत हा खूप सहिष्णू देश आहे, पण देशातील नागरिक देशाबद्दल घृणा पसरवीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे, असे आवाहन अभिनेता आमिर खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे.

आपला देश खूप सहिष्णू आहे पण येथील नागरिक देश तोडण्याची भाषा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच अशा लोकांना रोखू शकतात, असे वक्तव्य इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात आमिर खानने केले आहे.  आपल्याला सुरक्षतेची भावना आपल्या न्यायव्यवस्थेकडून मिळालेली आहे, तसेच आपण ज्या प्रतिनिधींना निवडून आणतो, त्यांनी कोणतेही चुकीचे काम केल्यास त्यांच्याविरोधात बोलण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे.

देशात कायदा हा सर्वासाठी समान असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, परंतु देशातील काही लोक देशात चुकीचा संदेश पोहोचवत आहेत. याबद्दल मोदी नक्कीच चिंता करीत असतील. म्हणूनच सब का साथ, सब का विकास हे घोषवाक्य तयार केले असावे, असेही आमिर म्हणाला.

आमिर खानला त्यांच्या सदिच्छा दूताबद्दल प्रश्न विचार असता, त्याने ही भारतभूमी माझी आई आहे, हा एक ब्रॅण्ड नाही. मी माझ्या आईला कधीही ब्रॅण्ड म्हणून पाहिलेले नाही. मी अजूनही भारताचा सदिच्छा दूत म्हणून काम करणार होतो, पण मला सरकारने नकार कळवला. मी गेली १० वर्षे अतुलनीय भारत आणि ‘अतिथी देवो भवो’ या योजनेसाठी सदिच्छा दूत म्हणून कार्य करीत होतो, आणि या लोकसेवेसाठी मी कोणतेही पैसे घेतले नव्हते आणि भविष्यातही घेणार नाही, असे आमिर म्हणाला.

काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या पत्नीने भारतात वाढत्या असहिष्णुतेबद्दल देश सोडून जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल अमिताभ बच्चन यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल आमिरने आम्ही देश सोडून कुठेही चाललो नाही, आमचा जन्म याच देशातील आहे आणि मृत्यूदेखील येथेच होणार आहे असे सांगितले. आमिरने वृत्त वाहिन्यांवर आणि माध्यमांनाही देशात असुरक्षितता निर्माण होईल अशा प्रकारच्या हिंसाचारावर लक्ष न देता देशातील सामान्य नागरिकांच्या फायद्याचे वृत्त देण्याचे आवाहन केले.