‘आम आदमी’ पक्षाचे काही उमेदवारी बेकायदा पद्धतीने निधी गोळा करत असल्याचे वृत्त ‘मीडिया सरकार’ या वृत्तवाहिनेने प्रसारित केल्यानंतर या पक्षाने त्यांच्याविरोधात दिल्ली न्यायालयात गुन्हे खटला दाखल केला आहे. या खटल्यावर २५ जानेवारी सुनावणी होणार आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’ करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या कार्यकारी अधिकाऱ्याला या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभेची निवडणूक चार डिसेंबर रोजी होत असताना तत्पूर्वी या वृत्तवाहिनीने हे वृत्त दाखवले आहे. हे वृत्त चुकीचे आणि तथ्यहीन असून, पक्षाची बदनामी करण्यासाठी ते प्रसारित करण्यात आले आहे, असे ‘आम आदमी’ पक्षाचे वकील व्ही. के. ओहरी यांनी सांगितले. वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या सीडीत पक्षाला आणि पक्षाच्या उमेदवारांना बदनाम करण्यासाठी सोयीचे बदल करण्यात आले आहेत, असेही ओहरी म्हणाले.
दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाला फायदा होण्याची भीती काँग्रेस आणि भाजप या पक्षांना आहे. त्यामुळेच पक्षाला बदनाम करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर करून त्यांनी पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे. प्रत्यक्ष दृश्य काय होते आणि या सीडीत कशा प्रकारे बदल करण्यात आले, याचे पुरावे आम्हाला मिळाले असून, न्यायालयात ते सादर करण्यात येतील, असे ओहरी यांनी सांगितले.