कपिल मिश्रा यांना आम आदमी पक्षातून (आप) काढल्यापासून ते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अजूनही त्यांच्या आरोपांची मालिका थांबलेली दिसत नाही. केजरीवाल हे गतवर्षी केवळ दोन वेळाच आपल्या कार्यालयात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. केजरीवाल अनेक दिवसांनंतर घराबाहेर पडल्यामुळे सर्वांना वाटले की, ते आपल्या कार्यालयात जातील. पण त्यांनी थेट चित्रपटगृह गाठले आणि ‘सरकार ३’ हा चित्रपट पाहिला, अशी माहिती त्यांनी दिली. अरविंद केजरीवाल पहिले असे मुख्यमंत्री आहेत. ज्यांच्याकडे काम करण्यासाठी कोणते खातेच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मिश्रा यांनी आपल्या ब्लॉगचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी केजरीवाल यांच्याबाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

केजरीवाल यांनी निष्पाप दिल्लीकरांना फसवले आहे. ते सध्या आपल्या सहकाऱ्यांबरोबर एका बंद खोलीत भेटतात. जनतेला घाबरण्याची काही गरज नाही. कारण खूप दिवस ते काही लक्षात ठेवत नाहीत, असे ते आपल्या सहकाऱ्यांना सांगतात. जनता काही दिवस ओरडेल, नंतर सर्व विसरून जाईल, असे केजरीवाल म्हणत असल्याचे मिश्रांनी सांगितले. आपल्याला लक्षातही नाही की, ते शेवटचे सचिवालयात कधी आले होते. केजरीवाल यांनी जनतेशी खूप कमी वेळा संवाद साधला आहे. त्यांना जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही. ते कायम सुटीवर असतात. त्यांच्याविरोधात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहेत. सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप असलेले ते पहिले मुख्यमंत्री बनले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून २ कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ‘आप’नेही कपिल मिश्रांवर ते काही काम करत नसल्याचा आरोप केला होता. भाजप आणि काँग्रेसने कपिल मिश्रांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा मागणी केली आहे.