आपच्या वीस आमदारांवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिसताच त्यावर टीकाही सुरु झाली आहे. आम आदमी पक्षाचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी सध्याच्या परिस्थितीवर ट्विट करत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी २० आमदारांना अपात्र ठरवले जाण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आम आदमी पक्षात नाराजी आणि चिंतेचे वातावरण आहे.

आपचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांनी ट्विट करून अरविंद केजरीवाल यांच्यावरच निशाणा साधला आहे. ”मेरा इस्तीफा मांगते-मांगते २० विधायक खो दिए घुंघरू सेठ ने … गिद्धों के मनाने से गाय नहीं मरती चपडगंजू।” अशा ओळी लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

कपिल मिश्रा यांनी हे ट्विट करताच नेटकऱ्यांना आयते कोलीतच हाती मिळाले. नेटकऱ्यांनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवली. वर्ड ऑफ द डे-चपडगंजू असे म्हण स्नेहा सिंघवी या महिलेने अरविंद केजरीवालांना टोमणा मारला. तर मालक आधीपासूनच दुःखी आहेत, त्यांच्या दुःखावर मीठ टाकू नका, त्यापेक्षा अॅसिड ओता अशा आशयाचा ट्विटही एका युजरने केला. तसेज केजरीवाल यांचा उल्लेख घुंगरूसेठ असा वारंवार करूनही त्यांची खिल्ली उडवण्यात आली. आमचे काहीही ऐकून न घेता आम्हाला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला गेला आहे अशी तक्रार आपच्या आमदारांनी कोर्टात केली मात्र कोर्टाने त्यांना फटकारले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी म्हणजेच २२ जानेवारी रोजी होणार आहे.