२००८ च्या आरूषी हत्याकांडप्रकरणी सुप्रीम कोर्टाने तलवार दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नोकर हेमराजच्या पत्नीने आव्हान दिले आहे. तिने दाखल केलेल्या याचिकेनंतर तलावार दाम्पत्याला सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. हेमराजची पत्नी खुमकला बंजाडेने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले.

२६ नोव्हेंबर २०१३ ला सीबीआय न्यायालयाने तलवार दाम्पत्याला आरूषी हत्याकांड आणि नोकर हेमराजची हत्या केल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र १२ ऑक्टोबर २०१७ मध्ये अलाहाबाद कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय बदलून तलवार दाम्पत्याची सुटका केली. या हत्याकांड प्रकरणात पुराव्यांचा अभाव असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. नेमक्या याच निर्णयाचा हेमराजच्या पत्नीने आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यानंतर सुप्रीम कोर्टाने तलावार दाम्पत्याला नोटीस बजावली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

१५ मे २००८ च्या रात्री नोएडा येथील सेक्टर २५ च्या जलवायू विहार भागात डॉक्टर तलवार यांच्या अल्पवयीन मुलीची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. तर या हत्येच्या दुसऱ्या दिवशी तलवार दाम्पत्याच्या घरी काम करणारा नोकर हेमराज याचाही मृतदेह याच इमारतीच्या गच्चीवर मिळाला होता. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी २३ मे २०१३ रोजी डॉक्टर राजेश तलवार आणि त्यांच्या पत्नीला अटक केली.

१ जून २०१३ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने केलेल्या तपासाच्या आधारावर गाझियाबाद येथील सीबीआय कोर्टाने नोव्हेंबर २०१३ मध्ये दुहेरी हत्याकांड आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांवरून तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर तलवार दाम्पत्य कारागृहात होते. २१ जानेवारी २०१४ रोजी तलवार दाम्पत्याने सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ११ जानेवारी २०१७ ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने तलवार दाम्पत्याने दाखल केलेल्या याचिकेबाबत निर्णय राखून ठेवला. त्यानंतर १२ ऑक्टोबर २०१७ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तलवार दाम्पत्यावरचे आरोप मागे घेत त्यांची सुटका केली होती.