दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ गावातील चार मुलांनी पीडितेचं अपहरण करून हे कृत्य केल्याचं समोर आलं. सामूहिक अत्याचाऱ्याच्या घटनेनंतर घरी परतलेल्या पीडितेनं टोकाचं पाऊल टाकत स्वतःच आयुष्य संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक जण फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपींने पोलिसांच्या तावडीतून पोबारा केला. त्याला पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं.

पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थीनी ट्यूशनला जात होती. त्यावेळी ती तरुणांसह आलेल्या गावातीलच एका तरुणाने तिला रस्त्यात अडवलं. त्यांनी तिला जबरदस्ती एका निर्मनुष्य घरात नेलं. तिथे आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

पीडित विद्यार्थीनी नेहमीच्या वेळ घरी न आल्यानं तिच्या भावाने तिचा शोध घेणं सुरू केला. “जेव्हा ती (बहीण) नेहमीच्या वेळेत घरी आली नाही, तेव्हा आम्ही तिच्या ट्यूशन सेंटरवर गेलो. तिथे गेल्यानंतर ती ट्यूशनला आलेलीच नसल्याचं कळालं. त्यानंतर आम्ही तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तिचा शोध लागला नाही. त्यानंतर रात्री आम्ही घरी गेलो, तेव्हा ती रक्तबंबाळ आणि कपडे फाटलेल्या अवस्थेत घरात आढळून आली. तिला नीट बोलताही येत नव्हतं. आम्ही तिला रुग्णालयात घेऊन गेलो. तिथेच तिचा मृत्यू झाला, असं पीडितेच्या भावाने तक्रारीत म्हटलं आहे.

“पीडित मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती गुरूवारी दुपारी मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. विष प्राशन केल्यानं मुलीचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. तसंच एक सुसाईड नोट आढळून आली असून, त्यात मुख्य आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे,” अशी माहिती मेरठचे पोलीस अधीक्षक केशव कुमार यांनी दिली.

न्यायालयात हजर करण्यापूर्वी फरार… चकमक

सरधना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तर एक आरोपी फरार आहे. दोन्ही आरोपींनी न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस निघाले होते. यावेळी एका आरोपीने पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेत पोबारा केला. याची माहिती मिळाल्यानंतर मेरठ व सरधना पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. कपसाड गावात आरोपीला पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. तर प्रत्युत्तर पोलिसांनीही गोळीबार केला. यात आरोपीच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी आरोपीला जखमी अवस्थेत अटक केली.