भारतीय तपासयंत्रणांच्या जाळ्यात सापडलेला ७० वर्षीय दहशतवादी अब्दुल करीम टुण्डा पोलिसांसमोर घडाघडा बोलू लागला आहे. भारतासाठी ‘मोस्ट वॉण्टेड’ असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीतच राहात असून त्याला आयएसआयचे सुरक्षाकवच लाभले असल्याचा गौप्यस्फोट टुण्डाने केला आहे. उल्लेखनीय म्हणजे अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी दाऊद पाकिस्तानात नसल्याचा दावा केला होता.
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला टुण्डा याने चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दाऊद इब्राहिमने आपल्याला २०१० मध्ये भेटावयास बोलावले होते. कराचीतील एका सुरक्षित स्थळी दाऊद राहात असून त्याच्यासाठी २४ तास आयएसआयची सुरक्षा तैनात असते असे टुण्डाने चौकशीदरम्यान सांगितले. दाऊदबरोबरच भारताच्या ‘मोस्ट वॉण्टेड’ यादीतील हाफीज सईद, मौलाना मसूद अझर आणि झकी-उर-रहमान लखवी अशा अनेकांशी आपण सातत्याने संपर्कात होतो अशी कबुलीही टुण्डाने दिली आहे. टुण्डा आयएसआयच्याही संपर्कात होता. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेशी टुण्डाचे निकटचे संबंध होते, अगदी लहानातल्या लहान संघटनेशीही त्याने भारतविरोधी कारवायांसाठी संधान साधले होते असे तपासयंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
टुण्डाने भारतात दहशतवादाचे उत्तम जाळे निर्माण केले होते. भारतातील हस्तकांकरवी तो त्याचा कार्यभाग साधायचा. बॉम्ब तसेच खोटय़ा चलनी नोटा पाठवण्यासाठी टुण्डाने देशातीलच तरुणांची निवड केली होती असे स्पष्ट होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

लखवी हाच‘लष्कर’चा सूत्रधार
लष्कर-ए-तैयबाची खडानखडा माहिती असलेला टुण्डा एकेकाळी या संघटनेच्या भारतविरोधी कारवायांचा संस्थापक सदस्य होता. मात्र, एका प्रकरणात लष्करचा म्होरक्या झकी-उर-रहमान लखवी याच्याशी त्याचे मतभेद झाले. त्यानंतर मात्र त्याची संघटनेतून हकालपट्टी झाली. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा प्रमुख आरोपी असलेला लखवी हाच ‘लष्कर’ची सूत्रे हाताळतो, असेही टुण्डाने चौकशीत सांगितले आहे.