गुरू ग्रंथसाहिब या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथाची फाडलेली पाने आज मोगा जिल्ह्य़ात तीन ठिकाणी सापडली आहेत, त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला. माल्की खेडय़ात फाडलेली पाने आढळून आली असून स्थानिक लोकांनी यासाठी जबाबदार व्यक्तींना अटक करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी निदर्शकांनी केली.
वरिष्ठ प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी मोठय़ा प्रमाणात निदर्शक जमले होते.
पोलीस उप महानिरीक्षक अमर सिंग चहल यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे व न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक पुरावे गोळा करीत आहे. या घटनेमागे असलेल्या व्यक्तींना अटक केली जाईल व कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस उप महानिरीक्षकांनी सांगितले.
अखिल भारतीय शीख विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष कर्नेल सिंग व भाई मोखम सिंग व बलजित सिंग यांनी या घटनेबाबत टीका केली असून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे.
पंजाबमध्ये गेल्या महिन्यात गुरू ग्रंथसाहिबची विटंबना करण्याच्या दहा घटना घडल्या असून त्यामुळे पंजाबमध्ये अशांतता आहे. या घटनांमध्ये दोनजण मारले गेले होते व काही जण जखमी झाले होते.