नवी दिल्ली : कोविड-१९ रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालये व शुश्रूषागृहे यांना २ लाख रुपये व त्याहून अधिक रक्कम रोखीत स्वीकारण्याची मुभा देणारी अधिसूचना प्राप्तिकर खात्याने जारी केली आहे. प्राप्तिकर खात्यासाठी धोरण निश्चित करणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अशा आशयाची अधिसूचना शुक्रवारी जारी केली. रुग्णालये, औषधालये, शुश्रूषागृहे, कोविड केअर सेंटर्र्स किंवा रुग्णांना करोनाविषयक उपचार पुरवणारी इतर वैद्यकीय केंद्रे यांना प्राप्तिकर कायद्याच्या कलम २६९ एसटी अन्वये विनिर्दिष्ट करण्यात आले असल्याचे यात म्हटले आहे. ही ताजी तरतूद १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीसाठी करण्यात आली असून, रुग्णाचा किंवा बिल अदा करणाऱ्याचा पॅन किंवा आधार क्रमांक घेतल्यानंतर, तसेच रुग्ण आणि पैसे देणारा यांच्यातील नात्याची पडताळणी केल्यानंतर ती लागू होईल, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. उपचारांसाठी रुग्णालयांत जाणाऱ्या करोना रुग्णांचे नातेवाईक व मदतनीस यांची अडचण दूर करणे हा या तरतुदीचा उद्देश आहे.