जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकावण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याची केंद्राने दखल घेतली असल्याचे सांगून, अशा घटनांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.
आम्ही प्रत्येक घटनेची नोंद घेतली आहे, मात्र जाहीररीत्या काही बोलून कृती केली जात नसते, असे गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. काश्मीर खोऱ्यात गेल्या दोन दिवसांत, तसेच अलीकडच्या काळातही पाकिस्तानी झेंडे फडकावले गेल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. खोऱ्यात पाकिस्तानी झेंडे फडकावणाऱ्या युवकांची सुरक्षा दलांनी ओळख पटवली असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई नक्कीच केली जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. आज ईदच्या प्रार्थनेनंतर श्रीनगरच्या अंतर्गत भागात पाकिस्तानी झेंडे फडकावले गेल्यानंतर श्रीनगर व अनंतनाग जिल्ह्य़ाच्या अनेक भागांत दगडफेक करणारे तरुण व सुरक्षा दले यांच्यात चकमकी झडल्या. शुक्रवारीही काही फुटीरवाद्यांनी श्रीनगरमध्ये पाकिस्तानसह लष्कर-ए-तोयबा व इसिसचे झेंडे फडकावले होते.