गेल्या दीड वर्षापासून भारतासह जगभरात करोनाचं संकट ठाण मांडून बसलं आहे. या संकट काळात सुरुवातीला आख्ख जगच लॉकडाउनमध्ये बंद झाल्याचं दिसून आलं. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत जगभरातल्या अनेक संशोधकांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आलं आणि करोनाची लस तयार झाली. जगभरात वेगगळ्या संस्थांनी तयार केलेल्या लसी दिल्या जाऊ लागल्या. भारतात देखील AstraZeneca आणि Oxford यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या लसीचं Serum Institute मध्ये उत्पादन सुरू झालं. भारताप्रमाणेच जगभरात देखील सिरमनं Covishield लसीची निर्यात सुरू केली. पण काही कालावधीनंतर ही निर्यात थांबवण्यात आली. या प्रक्रियेविषयी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी इंडिया ग्लोबल फोरम २०२१ मध्ये भाष्य केलं आहे.

“..त्यांना सांगावं लागलं की आमच्याकडे पर्यायच नव्हता!”

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा वाढू लागला. या पार्श्वभूमीवर देशात व्यापक स्तरावर लसीकरण करण्याला प्राधान्य दिलं जाऊ लागलं. या पार्श्वभूमीवर कोविशिल्ड लसींचा अधिकाधिक पुरवठा भारतातच व्हावा, या हेतूने सिरमकडून केली जाणारी निर्यात थांबवली गेली. या पार्श्वभूमीवर नेमकं तेव्हा काय झालं, यावर अदर पूनावाला यांनी भूमिका मांडली आहे. “कोविशिल्डची निर्यात थांबवणं हा कंपनीसाठी फार कठीण निर्णय होता. तो घेताना फार ताण आला होता. कारण मुद्दा फक्त आमचे पार्टन AstraZeneca च्या मागणीचा नव्हता. Covax ला देखील निर्यात होत होती. इतर देशांसोबत देखील आमची बांधीलकी होती. आम्ही त्यांच्याकडून बुकिंगसाठी आगाऊ निधी घेतला होता. आम्हाला त्यातला काही निधी परत द्यावा लागला”, असं पूनावाला म्हणाले.

 

“हळूहळू सगळ्यांनी समजून घेतलं”

“निर्यात बंद केल्यानंतर आम्हाला त्यांना समजवावं लागलं की त्या वेळी (निर्यात थांबवण्याशिवाय) दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्हाला त्यांना सांगावं लागलं की त्या वेळी आमच्या देशाला मदत करणं आमच्यासाठी आवश्यक आहे. काही महिन्यांत आम्ही पुन्हा तुम्हाला पुरवठा करू. सगळ्यांसाठी हे समजून घेणं कठीण होतं. पण हळूहळू त्यांना जाणवलं की भारतात तेव्हा काय परिस्थिती होती. तेव्हा सगळ्यांनी समजून घेतलं आणि आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला”, असं देखील अदर पूनावाला म्हणाले.

 

“आपल्याला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आणि…”

“आम्ही भारतातून मोठ्या प्रमाणावर लसींची निर्यात करायला सुरुवात केली होती. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आम्ही तब्बल ६ कोटी डोस निर्या केले. कदाचित इतर कोणत्याही देशाने अशा प्रकारे निर्यात केलेल्या संख्येपैकी ही सर्वाधिक असेल. पण नंतर आपल्याला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आणि आम्ही पूर्ण लक्ष भारतावर केंद्रीत केलं. कारण त्यावेळी तेच गरजेचं होतं”, असं अदर पूनावाला यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये बोलताना सांगितलं.