नरेंद्र मोदी यांची भाजपच्या निवडणूक प्रचारसमितीच्या प्रमुखपदी निवड केल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच अडवाणींनी आपल्या ब्लॉगवर शरपंजरी पडलेल्या भीष्म पितामहांचा उल्लेख करून या चर्चेला फोडणी दिली. पोटाच्या दुखण्यामुळे गोव्यातील पक्षकार्यकारीणीच्या बैठकीस उपस्थित राहू न शकलेल्या अडवाणींनी ब्लॉगवरील या लेखात मोदी किंवा भाजपच्या कार्यकारिणीच्या गोव्यातील बैठकीचा उल्लेख केला नाही. पण त्या बैठकीपाठोपाठ आलेला हा लेख अडवाणींचे ‘शरपंजरी’ दु:ख सांगणारा तर नाही, अशी चर्चा सुरू झाली.
अर्जुनाला भगवद्गीतेचे मार्गदर्शन करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या चंदनात कोरलेल्या आपल्याकडील कलाकृतीचे वर्णन करणारा लेख अडवाणी यांनी ब्लॉगवर लिहिला आहे. या कलाकृतीत द्रौपदीच्या वस्त्रहरण आणि शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यापासून ते दशावतारांपर्यंतचे सर्व प्रसंग चितारण्यात आले असल्याचे अडवाणी यांनी म्हटले आहे.
अडवाणींनी या ब्लॉगवर हिटलर, मुसोलिनी व पोप यांच्या एका किश्श्याचा उल्लेख केला आहे. आपल्या नृशंस कृत्यांमुळे आपल्याला नरकातच जावे लागणार, अशी भीती हिटलर मुसोलिनीकडे व्यक्त करतो. मुसोलिनीही आपण याबाबत माफी मिळावी तसेच स्वर्गात जाता यावे, म्हणून पोपना विनंती करणार असल्याचे सांगतो. प्रत्यक्षात मात्र फक्त पोपच स्वर्गात जातात तर उर्वरीत दोघे मात्र नरकात जातात, असा तो किस्सा असल्याचे अडवाणींनी सांगितले आहे.
मात्र अडवाणींच्या या ‘ब्लॉग’संधानामुळे भीष्म हे रुपक त्यांनी नेमके कोणासाठी वापरले, विश्वरुपम चित्रपट आणि श्रीकृष्णाचे उदाहरण देण्यामागे त्यांना काय सुचवायचे असावे आणि अखेरच्या किश्श्यातील हिटलर-मुसोलिनी व पोप ही रुपके आहेत की निव्वळ उल्लेख अशा शंकांना उधाण आले आहे.