अफगाणिस्तानात दोन बस व इंधनाचा एक टँकर यांच्या अपघातात बावन्न जण ठार झाले आहेत, असे अफगाणी अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्व गझनी प्रांताचे प्रवक्ते जावेद सलांगी यांनी सांगितले, की या अपघातात ७३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात महिला व मुले यांच्यासह ५२ जण ठार झाले. एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बेदरकार गाडी चालवण्याने हा अपघात झाला आहे. दोन बसगाडय़ामध्ये १२५ प्रवासी होते. त्यात ७३ जण वाचले असून ५२ जण मरण पावले. वाचलेल्यांना जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल केले आहे. कंदहार व काबूल यांना जोडणाऱ्या महामार्गावर हा अपघात सकाळी सात वाजता झाला. दरम्यान दुपारी हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात यश आल्याचे सालंगी यांनी सांगितले. बसगाडय़ा एकामागोमाग एक काबूलहून कंदाहारकडे जात होत्या असे वाहतूक विभागाचे अधिकारी महंमदुल्ली अहमदी यांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांनी अग्निशामक दलाला मदत केली. अफगाणिस्तानात रस्ते अपघातांचे प्रमाण जास्त असून वाहतूक नियम न पाळणे व रस्त्यांची दुरवस्था ही त्यामागची कारणे आहेत.