तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर २० वर्षांनंतर सत्ता प्रस्थापित केली असली, तरी अजूनही या सरकारला जागतिक पातळीवर मान्यता मिळालेली नाही. मानवी हक्क, महिलांचे हक्क, स्वातंत्र्य या सगळ्याच मुद्द्यांवर जागतिक स्तरावर चिंता आणि शंका आहे. त्यात तालिबान्यांना मात्र आपल्या सरकारला जागतिक स्तरावर स्वीकृती मिळवायची असल्यामुळे अनेक नवनव्या गोष्टी या सरकारकडून केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये ४०० खेळांना परवानगी दिली आहे. नव्या सरकारच्या इतर अनेक घोषणांपैकी ही देखील एक महत्त्वाची घोषणा आहे. मात्र, यावेळी महिलांना या खेळांमध्ये सहभागी होता येणार की नाही? याविषयी मात्र कोणतीही स्पष्टता धोरणात देण्यात आलेली नाही.

अफगाणिस्ताना डायरेक्टर जनरल ऑफ स्पोर्ट्स अर्थात क्रीडामंत्री असलेला बशीर अहमद रुस्तमझईनं पत्रकार परिषदेत तालिबानी सरकारच्या क्रीडाविषयक धोरणाविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. यानुसार, आता अफगाणिस्तानमध्ये ४०० खेळांना परवानगी असणार आहे. “जोपर्यंत एखादा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात जात नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही खेळावर बंदी आणणार नाही”, असं रुस्तमझईनं जाहीर केलं. मात्र, महिलांविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नाला त्याने बगल दिली.

महिला खेळाडूंविषयी उत्तर टाळलं!

या ४०० खेळांमध्ये महिलांना सहभाग घेता येईल की नाही, याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता रुस्तमझईनं त्याचं उत्तरच देणं टाळलं. “कृपया आता महिलांविषयी प्रश्न विचारू नका”, असं त्यानं स्पष्टच सांगिल्यामुळे नेमकी तालिबान्यांचा महिलांना खेळांमध्ये सहभागी होऊ देण्याविषयी काय भूमिका आहे, हे समजणं कठीण झालं आहे. मात्र, तालिबान्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीवरून महिलांना खेळांमध्ये सहभागी होता येणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत.

“खेळाडूंनी पँट थोडी लांब घालावी”

याविषयी बोलताना रुस्तमझई म्हणाला, “क्रीडा प्रकारांमध्ये शरिया कायदा पाळणं म्हणजे इतर देशांमध्ये जी व्यवस्था आहे, त्यात थोडाफार बदल आत्मसात करणे होय. यात फारसा बदल नाही. उदाहरणार्थ, फुटबॉल खेळणारे खेळाडू किंवा बॉक्सिंग करणाऱ्या खेळाडूंनी पँट गुडघ्यांच्या खालीपर्यंत जाईल इतकी लांब घालावी”, असं रुस्तमझईनं स्पष्ट केलं आहे.

गेल्या आठवड्यातच तालिबान सांस्कृतिक आयोगाचा अध्यक्ष अहमदुल्लाह वासिक यानं याबाबत बोलताना म्हटलं होतं की, “महिलांना कोणताही खेळ खेळण्याची गरज नाही”!