बेंगळुरूमध्ये ‘बंदिस्त’ करून ठेवलेले गुजरातमधील काँग्रेसचे ४४ आमदार अखेर अहमदाबादमध्ये परतले आहेत. आणंदमधील निरजानंद रिसोर्टमध्ये या आमदारांना हलवण्यात आले असून रिसोर्टबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत तिसऱ्या जागेसाठी भाजपने बलवंतसिह राजपूत यांना उमेदवारी दिली असून भाजपच्या या खेळीने काँग्रेस नेते अहमद पटेल यांची कोंडी झाली आहे. या निवडणुकीत अहमद पटेल हे तिसरे उमेदवार असून ते बिनविरोध निवडून येतील असे चित्र सुरुवातीला होते. मात्र राजपूत रिंगणात उतरल्याने पटेल यांच्या अडचणी वाढल्या. यात भर म्हणजे काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्याने पटेल यांना हादरा बसला. अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असून त्यांचा पराभव करण्याचा चंगच भाजपने बांधला आहे.

गुजरातमधील काँग्रेसच्या ५७ पैकी सहा आमदारांनी पक्षाला रामराम केल्यानंतर काँग्रेसने धसका घेतला आणि उर्वरित ५१ पैकी ४४ आमदारांना काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये हलवले. आठवडाभर हे आमदार बंगळुरुजवळील ‘इगलटन गोल्फ रिसोर्ट’मध्ये बंदिस्त होते. मंगळवारी गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटे काँग्रेसचे ४४ आमदार अहमदाबादमध्ये परतले. अहमदाबादमध्ये येताच त्यांना आणंदमधील एका रिसोर्टमध्ये नेण्यात आले आहे. या रिसोर्टबाहेर कडेकोट बंदोबस्त असून रिसोर्टच्या आतमध्ये अज्ञात व्यक्तीला प्रवेश देणार नाही अशी माहिती आणंदच्या पोलीस अधीक्षकांनी दिली. गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी अहमद पटेल यांच्यासह अमित शहा आणि स्मृती इराणी हेदेखील रिंगणात आहे. मात्र अमित शहा आणि स्मृती इराणींचा विजय निश्चित मानला जात आहे.

काय आहे राज्यसभेचे गणित?
अहमद पटेल यांना प्रथम प्राधान्यांची किमान ४६ मते हवी आहेत. सहा आमदारांनी काँग्रेसला अधिकृतपणे रामराम ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेस आमदारांची संख्या ५१ आहे. भाजपच्या सूत्रांनुसार काँग्रेसचे २० आमदार तरी फुटतील. पण काँग्रेसच्या मते सातपेक्षा जास्त आमदार फुटणार नाही. काँग्रेसचा अंदाज खरा मानल्यास अहमद पटेल यांना ४४ मते पडू शकतील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आणि संयुक्त जनता दलाचा आमदार यांचे मतही काँग्रेसला तारु शकेल. जदयूच्या आमदाराची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.