एअर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करण्यावरून केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यानंतर एअर स्ट्राइकची गरज होती, असे त्या म्हणाल्या. त्यावेळी विश्वास ठेवता येतील अशी अनेक कारणे त्यांच्याकडे होती. इतकेच काय तर लष्कराने त्यावेळी यूपीए सरकारकडे यासाठी प्रस्तावही मांडला होता, असे वक्तव्य सीतारामन यांनी केले. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारतीय वायूसेनेने केलेल्या एअर स्ट्राइकवर विरोधी पक्षाकडून सातत्याने शंका उपस्थित केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनीही एअर स्ट्राइकबाबत पुरावा मागितला होता.

सीतारामन हैदराबाद येथे माजी सैनिकांच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. जर अशी कारवाई मुंबई हल्ल्यानंतर केली असती तर.. भारतीय लष्कराने त्यावेळीही सरकारला विचारणा केली होती. जर तुमची इच्छा असेल आम्ही काही करावे तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. पण याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल, असे लष्कराने त्यावेळी म्हटले होते.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसवर निशाणा साधताना मुंबई हल्ल्यानंतर भारतीय लष्कर एअर स्ट्राइक करण्यास तयार होते. पण तत्कालीन यूपीए सरकारने परवानगी दिली नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही एअर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केला होता.